इचलकरंजी: स्वातंत्र्यदिनानिमित्त 'केन चेस अकॅडमी'तर्फे भव्य मोफत बुद्धिबळ कॅम्प उत्साहात
schedule17 Aug 26 person by visibility 125 categoryराज्य
इचलकरंजी : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत 'केन चेस अकॅडमी' आणि 'चेसबेस इंडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी इचलकरंजी येथे एका भव्य मोफत बुद्धिबळ कॅम्पचे आयोजन करण्यात आले. ५० वर्षांची परंपरा लाभलेल्या 'मेडिकल असोसिएशन इचलकरंजी'चे सभागृह या कॅम्पसाठी सहप्रायोजक म्हणून लाभले होते. देशमुख हॉल येथे झालेल्या या शिबिराला विद्यार्थी, पालक आणि बुद्धिबळपटूंचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
या मोफत बुद्धिबळ शिबिराचे उद्घाटन मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष डॉ. नितीन जाधव, सचिव डॉ. अमित देशमुख, खजिनदार डॉ. उत्तम माळी, क्रीडा समिती अध्यक्ष डॉ. श्रीधर जाधव आणि केन चेस अकॅडमीचे प्रोप्रायटर व मुख्य प्रशिक्षक रोहित पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक रोहित पोळ यांनी "Learn + Solve" या विशेष सत्रांतर्गत विद्यार्थ्यांना बुद्धिबळातील कूटप्रश्न आणि खेळाचे तंत्रशुद्ध बारकावे सोप्या भाषेत समजवून सांगितले.
शिबिरामध्ये तब्बल ४३ बुद्धिबळ पझल शीट्सचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
'ChessBase India Official' च्या वतीने विशेष सत्र घेऊन विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे तंत्रशुद्ध ज्ञान व मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
या मोफत शिबिरामुळे विद्यार्थ्यांना खेळाचा आनंद लुटण्यासोबतच बुद्धिबळाचे धडे गिरवण्याची उत्तम संधी मिळाली. पालकांनीही आयोजकांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. खेळाडूंमधील बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी केन चेस अकॅडमीच्या वतीने भविष्यातही अशाच प्रकारचे स्तुत्य उपक्रम राबवले जातील, अशी माहिती आयोजकांनी दिली.