नंदुरबारला ३ महिन्यांनंतर मिळाला 'धडाकेबाज' पालकमंत्री; हसन मुश्रीफांकडे जिल्ह्याची धुरा, राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम!
schedule18 Mar 26 person by visibility 121 categoryराज्य
नंदुरबार: गेल्या तीन महिन्यांपासून पालकमंत्र्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या नंदुरबार जिल्ह्याला अखेर नवा कारभारी मिळाला आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते हसन मुश्रीफ यांची नंदुरबार जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने याबाबतचे अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.
माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शासकीय सदनिका प्रकरणातील दोषारोपानंतर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. परिणामी, डिसेंबर २०२५ पासून नंदुरबारचे पालकमंत्री पद रिक्त होते. जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी पूर्णवेळ पालकमंत्र्यांची मागणी होत असतानाच, आता ही जबाबदारी अनुभवी नेते हसन मुश्रीफ यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुश्रीफ यांच्याकडे आधीच सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी असून, आता नंदुरबारच्या रूपाने त्यांच्याकडे दुसऱ्या जिल्ह्याचा पदभार आला आहे.
माणिकराव कोकाटे यांच्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्याकडे नंदुरबारचे पालकमंत्रीपद गेल्याने महायुतीत राष्ट्रवादीची या जिल्ह्यावरील पकड मजबूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्याचे प्रलंबित प्रश्न, विकासकामे आणि प्रशासकीय कामांना आता मुश्रीफ यांच्या अनुभवाचा फायदा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.