SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
घोषवाक्य व निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : उपसंचालक (माहिती) प्रवीण टाकेशिवाजी विद्यापीठामध्ये प्रथमच 'माझे विद्यार्थी, माझे उद्योजक' माजी विद्यार्थ्यांसोबत सामंजस्य करारभीमा कृषी प्रदर्शन पाहण्यास चार दिवसात झाला गर्दीचा उच्चांकपर्यावरण जीवनवादाशी जोडल्यास मानवी जीवन सुसह्यविश्वकर्मा पुरस्कारासाठी 21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेतजीवाणू संसर्ग ओळखणारे पोर्टेबल इलेक्ट्रोकेमिकल उपकरण विकसित; डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठचे संशोधन आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; १० मार्च पर्यंत करता येणार अर्जकोल्हापूरच्या नुतन महापौर रुपाराणी निकम, उप-महापौर अक्षय जरग यांचा कार्यालयीन प्रवेशतात्यासाहेब कोरे डिप्लोमाच्या २१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवडभारतीय चित्रपटसृष्टीचे जनक: दादासाहेब फाळके

जाहिरात

 

पर्यावरण जीवनवादाशी जोडल्यास मानवी जीवन सुसह्य

schedule16 Feb 26 person by visibility 98 categoryशैक्षणिक

  🔹️अतुल देऊळगावकर : ‘साहित्य, संस्कृती, विज्ञान, माध्यमे आणि शाश्वत विकास’ विषयावर विशेष व्याख्यान

  कोल्हापूर : देशातील सध्याचा विकास ही सर्वभक्षी बाजार संस्कृतीचे लक्षण असल्याने विकासाच्या संकल्पनांची पुनर्मांडणी होणे आवश्यक आहे. यासाठी पर्यावरणाचा प्रश्न जीवनवादाशी जोडला गेला तरच मानवी जीवन सुसह्य होईल, असे मत ख्यातनाम पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले.

  शिवाजी विद्यापीठाचा पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासन, हिंदी अधिविभाग, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स आणि लक्ष्मी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘साहित्य, संस्कृती, विज्ञान, माध्यमे आणि शाश्वत विकास’ या विषयावरील विशेष व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.

  देऊळगावकर म्हणाले, "भारतीय समाज विकसित होता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणारा होता. तो निसर्गाच्या अधिक जवळ होता व जंगले त्याच्याच ताब्यात होती. ब्रिटिश राजवटीपूर्वी जलव्यवस्थापन, शेती आणि उद्योग समृद्ध होते. ब्रिटिश राजवटीत त्यांनी सर्व मूलभूत संरचनेवर अतिक्रमण केले, तेव्हापासून पर्यावरणाच्या र्‍हासाला सुरुवात झाली. सध्याचा विकास म्हणजे सर्वभक्षी बाजार संस्कृतीचे लक्षण आहे. त्याची पुनर्मांडणी होऊन त्यात जीवनवाद यायला हवा."
ते पुढे म्हणाले की, संत एकनाथ, तुकाराम, नामदेव यांनी साहित्यामधून जे तत्त्वज्ञान सांगितले, ते खऱ्या अर्थाने भारतीय समाजाचे जगणे होते. परदेशातील शाळांमध्ये पुस्तके, चित्रे आणि कवितांमधून निसर्ग सांगितला जातो, ज्याचा परिणाम अंतःकरणावर अधिक होतो. युरोपमध्ये उड्डाणपूल पाडून शहरे सायकलस्वार आणि पादचाऱ्यांसाठी खुली केली जात आहेत. भारतात हा आदर्श घेणे गरजेचे आहे. 'टिश्यू पेपर'च्या वापरामुळे आपण नकळतपणे निसर्गाच्या विनाशाला हातभार लावत आहोत. निसर्ग ओरडत नाही किंवा आंदोलन करत नाही, पण वाढती उष्णता आणि दुष्काळाच्या रूपाने तो प्रतिक्रिया देतो. उष्णता वाढीचा परिणाम केवळ पर्यावरणावरच नाही, तर मानवी मेंदू आणि कार्यक्षमतेवरही होत आहे. आपण 'स्मार्ट सिटी' तयार करण्यावर भर देत आहोत, पण स्मार्ट सिटी म्हणजे केवळ तंत्रज्ञान नसून जिथे झाडे, पाणी आणि गवत जपले जाते अशी शहरे होय. निसर्गाकडे जाणे हे आधुनिकतेचे आणि स्मार्ट होण्याचे लक्षण आहे, मात्र याकडे आपले दुर्लक्ष होत असल्याची खंत देऊळगावकर यांनी व्यक्त केली.

  अध्यक्षीय भाषणात डॉ. विलास शिंदे म्हणाले, "निसर्ग संवर्धनासाठी केवळ झाडे लावणे पुरेसे नाही, तर त्यामागचे विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. जैवविविधता टिकवण्यासाठी आपल्या परिसरातील स्थानिक झाडे लावण्यावर भर दिला पाहिजे. निसर्ग वाचवण्यासाठी प्रत्येकाने विवेकाने वागले पाहिजे. स्थानिक गरजा विचारात घेऊन पर्यावरणाचे शास्त्र आणि विज्ञान यांचा सुयोग्य मेळ घातला गेला पाहिजे."

  प्रास्ताविक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. पाहुण्यांची ओळख हिंदी विभागाच्या प्रभारी प्रमुख प्रा. डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी करून दिली. आभार सामाजिक बांधिलकी अधिकारी शरद आजगेकर यांनी मानले. यावेळी लक्ष्मी फाउंडेशनचे विनायक देसाई, ज्येष्ठ वास्तुविशारद शिरीष बेरी, सौ. बेरी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, ज्येष्ठ संपादक रावसाहेब पुजारी, राजश्री साकळे, डॉ. अविनाश भाले, डॉ. प्रकाश मुंज, डॉ. संतोष कोळेकर, डॉ. जयसिंग कांबळे, डॉ. गीता दौडमणी, डॉ. सुवर्णा गावडे, डॉ. सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील, अनुप जत्राटकर यांच्यासह संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes