कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळासाठी उद्योग क्षेत्राच्या गरजेनुसार नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविणार : मंत्री मंगलप्रभात लोढा
schedule19 Nov 25 person by visibility 64 categoryराज्य
मुंबई : राज्य शासनाकडे ‘आयटीआय’च्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, उद्योग क्षेत्रातील ज्ञान, अनुभव या सहभागातून कुशल व रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण होईल. उद्योग समूहांना त्यांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता यावे, यासाठी कौशल्य विभाग प्रयत्नशील राहील असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे पीपीपी मॉडेल बाबत विविध उद्योजकांशी संवाद साधताना कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते.यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, राज्य नाविन्यता सोसायटीचे कौशल्य विकास आयुक्त लहुराज माळी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.डॉ.अपूर्वा पालकर,राज्य नाविन्यता सोसायटीचे सहसचिव श्रीकांत पाटील उद्योग क्षेत्रातील मान्यवर, कौशल्य विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले ,उद्योग समूहांच्या सहकार्याने आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करुन कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तसेच तंत्र शिक्षण शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासन नामवंत उद्योग समुहांची मदत घेत असल्याचे कौशल्य मंत्री लोढा यांनी सांगितले.
कौशल्य मंत्री लोढा म्हणाले की, उद्योग समूहांकडे असलेला अनुभव या उपक्रमामध्ये उपयोगी पडणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण काळातच उद्योग समुहांनी त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रशिक्षण दिले तर यासाठी लागणारा वेळ आणि खर्च वाचेल. उद्योग समूहांना त्यांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता यावे, यासाठी आयटीआय परिसरात स्वतंत्र जागा उपलब्ध करुन दिली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे जात आहे. म्हणूनच महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येत आहे. उद्योगांसाठी महाराष्ट्रात पूरक वातावरण आहे. कुशल मनुष्यबळाच्या शोधात उद्योग समूहांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो. शासनासोबत भागीदारी केल्यास उद्योग समूहांची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण होईल आणि रोजगार निर्मितीही होईल, असेही लोढा यांनी सांगितले.
कौशल्य मंत्री लोढा म्हणाले की, ‘आयटीआय’च्या राज्यभरात मोठ्या पायाभूत सुविधा आहेत. राज्याच्या मध्यवर्ती शहरी भागात, औद्योगिक भागात तसेच तालुका स्तरावरही आयटीआयने विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा उभारलेल्या आहेत. उद्योगांनी शासनाशी भागीदारी केल्यास त्यांना संबंधित ‘आयटीआय’मध्ये त्यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळानुसार अतिरिक्त अभ्यासक्रम शिकविता येईल. त्याकरिता संबंधित उद्योग समुहाला कार्यालयासाठी अथवा सेवा केंद्रासाठी लागणारी जागा त्याच ‘आयटीआय’मध्ये उपलब्ध करुन दिली जाईल. दिवसभरात विद्यार्थ्यांच्या नियमित अभ्यासक्रमानंतर सायंकाळी उद्योग समूहास त्यांना आवश्यक असलेला अभ्यासक्रम स्वतंत्ररित्या विद्यार्थ्यांना शिकविता येईल. याशिवाय काही अल्प काळाचे अभ्यासक्रमही येथे शिकविता येतील असेही कौशल्यमंत्री लोढा यांनी सांगितले.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख यांनी राज्यातील आयटीआयबद्दल माहितीचे सादरीकरण केले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.