आगामी निवडणूका मधील उमेदवारांनाही रेड्याची टक्कर स्मृती शिल्प स्फुर्तीदायी : आमदार सतेज पाटील
schedule19 Nov 25 person by visibility 68 categoryराजकीय
कोल्हापूर : सागरमाळ येथील रेड्याची टक्कर स्मृती शिल्प हे इतिहासाची आठवण करुन देत असून आगामी निवडणुकांमधील उमेदवारांनाही रेड्याची टक्कर स्मृती शिल्प स्फुर्तीदायी ठरणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी केले. माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार जयश्री जाधव यांच्या निधीतून सागरमाळ येथे उभारलेल्या रेड्याची टक्कर स्मृती शिल्पाचे अनावरण आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, राजू लाटकर, प्रतिज्ञा उत्तुरे, भूपाल शेटे, काकासाहेब पाटील प्रमुख उपस्थित होते.
आमदार सतेज पाटील म्हणाले, सागरमाळ येथील रेड्याची टक्कर इतिहासात कोरली गेली आहे. नव्या पिढीला हा इतिहास माहीत व्हावा यासाठी हे शिल्प उभारले आहे. हे
शिल्प संपूर्ण जिल्ह्यातील गवळी समाजासाठीही प्रेरणादायी राहणार आहे.
या शिल्पाचे काम केलेले तरुण ठेकेदार तेजस माने यांनी मला नातू होईपर्यंत हे शिल्प हलणार नाही असा दावा केला. तोच धागा पकडत सतेज पाटील यांनी येथे आज केलेला रस्ता दुसऱ्या दिवशी वाहून जातोय असे सांगत शहरातील रस्त्यांच्या दर्जाबाबत चिमटा काढला.
शाहूनगर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी २० लाख व रेड्याच्या शिल्पाभोवती सीसीटीव्ही कॅमेरे व लाईटिंगसाठी ५ लाख रुपये देण्याची घोषणा सतेज पाटील यांनी केली.
माजी आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, रेड्याची टक्कर ही ओळख कायम रहावी त्यासाठी येथे शिल्प व्हावे ही स्व.चंद्रकांत जाधव यांचे स्वप्न होते. या शिल्पामुळे खऱ्या अर्थाने स्वप्नपूर्ती झाली आहे. माजी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा सोनेरी इतिहास पुढच्या पिढ्यांनाही कळावा यासाठी हे शिल्प उभारले.
यावेळी शिल्पकार ललित डोंगरसाने, माजी नगरसेवक विनायक फाळके, खंडू कांबळे, शिवाजी कवाळे, प्रवीण केसरकर, विजय सुर्यवंशी, दुर्गेश लिंग्रस, राजू साबळे, अनुप पाटील, सुरेश ठोणूक्षे, उमेश पवार, सर्जेराव साळोखे, समीर कुलकर्णी, स्वप्निल रजपूत, संदीप पाटील, रवींद्र नलवडे, विनायक सुर्यवंशी, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.