नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीतून पीडितांना न्यायाची हमी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
schedule19 Nov 25 person by visibility 76 categoryराज्य
▪️नवीन फौजदारी कायद्यांवरील ५ दिवसीय प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
▪️गुन्हे सिद्धतेचा दर ९० टक्क्यांपर्यंत नेण्याची नवीन फौजदारी कायद्यांमध्ये क्षमता
मुंबई : ब्रिटिशकालीन फौजदारी कायद्यांमध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील पुरावे गृहीत धरण्याची तरतूद नव्हती. त्यामुळे पुरावे नष्ट करून आरोपी सुटत होते. परिणामी, विविध गुन्ह्यांमधील पीडितांना न्यायासाठी बराच कालावधी लागत असे. आता मात्र केंद्र शासनाने लागू केलेल्या नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे पीडितांना विशिष्ट कालावधीत न्यायाची हमी मिळत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आझाद मैदानावर नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित पाच दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव राजेश कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतावर राज्य करण्यासाठी भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा ब्रिटिशांनी तयार केला होता. पीडितांना जलद गतीने न्याय मिळवून देण्याची व्यवस्था या कायद्यांमध्ये नव्हती. मात्र ही व्यवस्था या नवीन कायद्यांच्या निर्मितीने बदलून आरोपींना कठोर शासन आणि पीडितांना न्याय देणारी ठरत आहे. लोकशाहीत निवडून आलेले सरकार हे जनतेचे ‘ट्रस्टी’ असते. त्यानुसार या कायद्यांची निर्मिती करण्यात आली आहे. नवीन कायदे हे शिक्षेपेक्षा न्यायावर जास्त भर देणारे आहे.
२०१३ मध्ये राज्याचा गुन्हे सिद्धता दर नऊ टक्के होता, तो आता ५३ टक्क्यांवर आला आहे. या नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीद्वारे हा दर निश्चितच ९० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकता. शासनाने १४ शासन निर्णयाद्वारे पोलीस दलात विविध सुधारणा केल्या आहेत. पोलीस दलाचे नियुक्ती नियम आणि नवीन आकृतीबंध करण्यात आला आहे. नवीन आव्हानांना सज्ज असणारे पोलीस दल निर्माण करण्यात येत आहे. मागील काही वर्षात ५० हजार पेक्षा जास्त पदभरती करण्यात आली आहे. आपले पोलीस दल देशात क्रमांक एकचे आहे, ते आता जगातही अव्वल करण्यावर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
प्रास्ताविकात पोलीस महासंचालक श्रीमती शुक्ला यांनी प्रदर्शनाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. प्रदर्शन आजपासून २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सकाळी १० ते सायं ६ दरम्यान खुले असल्याचे सांगितले. गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री. चहल यांनी प्रदर्शन आणि नवीन कायद्यांविषयी विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाचे संचलन मृण्मयी भजक यांनी केले तर विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज कुमार शर्मा यांनी आभार मानले.