SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या मोहन जाधव यांना पीएच.डी. विकसित भारतासाठी तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहोचणे आवश्यक : संजय किर्लोस्करविद्यापीठाची ‘पेटंट गॅलरी’ ठरली लक्षवेधकविकासासाठी सत्ताधार्‍यांवर दबाव हवा : डॉ. वसंत भोसलेलोकशाहीच्या व्यापक विस्तारात जी. डी. बापूंचे स्मरण आवश्यक : खोरेतृतीयपंथीय धोरण 2024 राज्याकडून स्विकार25 जानेवारी रोजी 16 वा राष्ट्रीय मतदार दिनआचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन; राजकीय पक्षांच्या जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजनस्थानिक पातळीवर स्टार्टअप संस्कृतीचा विकास महत्त्वाचा: अश्विनी दाणीगोंडमहाराष्ट्र भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पहिल्याच दिवशी १४ लाख ५० हजार कोटी गुंतवणुकींचे १९ सामंजस्य करार

जाहिरात

 

विकसित भारतासाठी तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहोचणे आवश्यक : संजय किर्लोस्कर

schedule20 Jan 26 person by visibility 45 categoryराज्य

▪️डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारंभ उत्साहात; ९१२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

घुणकी : "भारताच्या विकासात शेती आणि अभियांत्रिकी क्षेत्राची निर्णायक भूमिका असून विकसित भारत केवळ धोरणात्मक चर्चेतून नव्हे, तर शेत, गाव, प्रयोगशाळा आणि तरुणांच्या नवकल्पनांतून साकार होईल. यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, पुणेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर यांनी केले.

तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष विलास शिंदे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (डि.लीट.) तर ओन्स्ट्रो टेक्नॉलॉजी प्रा. लि.चे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भावित नाईक यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी.) या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले.

या दीक्षांत समारंभात १५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, ११ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी, तर एकूण ९१२ विद्यार्थ्यांना विविध पदव्या प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. संजय डी. पाटील होते. व्यासपीठावर विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील,  पुजा ऋतुराज पाटील, तेजस पाटील, डॉ. अनिलकुमार गुप्ता, डॉ. जे. ए. खोत यांच्यसह बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे सदस्य, गव्हर्निंग बॉडी सदस्य आणि अकॅडमी कौन्सिल सदस्य

डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी येथे भव्य शोभायात्रेने दीक्षांत समारंभाची सुरुवात झाली. विश्वस्त पुजा ऋतुराज पाटील यांनी प्रास्ताविक केले.  विद्यापीठाच्या भविष्यातील योजनांची माहिती देऊन संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.

किर्लोस्कर पुढे म्हणाले, “शेती ही भारताची सांस्कृतिक व आर्थिक पायाभरणी आहे. मात्र आज शेतीसमोर अनेक आव्हाने आहेत. अचूक सिंचन, जलव्यवस्थापन, सौरऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित पीक सल्ला आणि लहान शेतकऱ्यांसाठी परवडणारे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तरुण अभियंते व कृषी तज्ज्ञांनी पुढाकार घ्यावा.” पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांनी प्रामाणिकपणा, नम्रता आणि समाजाप्रती बांधिलकी जपण्याचा संदेश दिला.

डि.लीट. पदवीने सन्मानित विलास शिंदे यांनी शेती ही केवळ संस्कृती न राहता व्यावसायिक व शाश्वत उद्योग म्हणून विकसित होणे आवश्यक असल्याचे सांगितले. राज्यातील सुमारे ५० टक्के लोकसंख्या कृषीवर अवलंबून असूनही शेतीला व्यवसाय म्हणून अपेक्षित मान्यता मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून कृषी व्यवसायाचे शिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

मानद डी.एस्सी. पदवी स्वीकारताना भावित नाईक म्हणाले, “या संस्थेने मला केवळ पदवी दिली नाही, तर विचार करण्याची दिशा, आत्मविश्वास आणि मूल्ये दिली. अपयश म्हणजे शेवट नसून पुढील यशाचा प्रारंभ असतो. सतत शिकत राहणे हीच खरी ताकद आहे.”

डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, 2022 मध्ये हे विद्यापीठ सुरू झाले तेव्हा 650  विद्यार्थी होते. आज येथे 4 हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ऋतुराज पाटील यांनी विद्यापीठाच्या विकासाचा रोड मॅप तयार केला आहे लवकरच हे विद्यापीठ जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवेल याचा विश्वास आहे.

कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडला. विद्यापीठ व प्राध्यापकांना मिळालेल्या विविध पुरस्कारांची माहिती दिली.

 यावेळी डॉ. वैजयंती संजय पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री पाटील, डी. वय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राकेश कुमार शर्मा, डी. वय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. मनिष भल्ला,  डॉ. पी. बी. साबळे, डी. वय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे डॉ. के. प्रथापन,  डॉ.वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे,  डॉ. अजितसिंह जाधव, अजित पाटील बेनाडीकर, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम यांच्यासह विद्यापीठाचे अधिष्ठाता, विविध संस्थांचे प्राचार्य, अधिकारी, प्राध्यापक, पदवीप्राप्त विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.शुभदा यादव, प्रा. शारुन काळे यानी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes