कोल्हापुरात स्टींग ऑपरेशन : श्री हॉस्पिटल रिसर्च ॲन्ड इन्स्टीटयूटमध्ये गर्भलिंग निदान उघड; कोल्हापूर जिल्हा प्रशासन, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची संयुक्त कारवाई!
schedule12 Jun 23 person by visibility 1014 categoryआरोग्य
कोल्हापूर : राजारामपूरी 1 ली गल्ली येथील डॉ.सोनल वालावलकर यांच्या श्री हॉस्पिटल रिसर्च ॲन्ड इन्स्टीटयूटबाबत प्रशासनाकडे तक्रार आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा प्रशासन व महापालिकेच्यावतीने स्टींग ऑपरेशन करण्यात आले. यावेळी डॉ.सोनल वालावलकर या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान करत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी एका महिलेस प्रशासनामार्फत डिकॉय केस म्हणून पाठविण्यात आले होते. या गरोदर महिलेकडून गर्भलिंग चाचणी साठी रु.15,000/- घेतलेचे स्टींग ऑपरेशन मध्ये आढळून आले आहे. त्यामुळे या हॉस्पीटलमधील सोनोग्राफी मशिन विभागीय समुचित प्राधिकारी डॉ.रति अभिवंत व पंच यांनी समक्ष सीलबंद केले.
यावेळी पोलिस प्रशासन व आरोग्याधिकारी डॉ.रमेश जाधव तथा समुचित प्राधिकारी पी.सी.पी.एन.डी.टी. कमिटी, सीपीआरच्या निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.हर्षला वेदक, ॲड गौरी पाटील, सामाजिक कार्यकर्त्या गीता हासुरकर व संबंधित गरोदर महिला व त्यांचे पती यांचे सहकार्य लाभले. या हॉस्पिटलवर पुढील आवश्यक ती कारवाई पीसीपीएनडीटी ॲक्ट अंतर्गत व शासनाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार सुरु आहे.
तरी शहरातील गर्भलिंग निदान व बेकायदेशीर गर्भपात होत असल्यास जागरूक नागरिकांनी या संदर्भात टोल फ्री क्रमांक 18002334475 या नंबरवर संपर्क साधावा किंवा याबाबत प्रशासनास माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.