महाराष्ट्राचे वैभव गड किल्ले प्रतिकृती 'दुर्गोत्सव' उपक्रम - विश्वविक्रमाच्या दिशेने एक पाऊल
schedule14 Oct 25 person by visibility 64 categoryराज्य

▪️‘दुर्गोत्सव’ अभियानात सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन
कोल्हापूर : अमृत संस्था यांच्या माध्यमातून यंदाच्या दिवाळीच्या कालावधीत ‘दुर्गोत्सव’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या दुर्गोत्सवामध्ये नुकतेच रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, साल्हेर दुर्ग, खांदेरीचा दुर्ग, पन्हाळगड, शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड, पद्मदुर्ग आणि जिंजी असे 12 किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेजचे नामांकन प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीमध्ये घराघरात किल्ले बनविण्याच्या परंपरेला एक नवे रूप देत, नागरिकांनी या 12 किल्ल्यांपैकी कोणत्याही एका किल्ल्याची प्रतिकृती बनवून तयार झालेल्या किल्ल्याचा स्वत:सह फोटो http://www.durgotsav.com या संकेतस्थळावर अपलोड करायचा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या वतीने 'अमृत' (महाराष्ट्र संसोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) संस्थेद्वारे महाराष्ट्राचे ऐतिहासिक वैभव असलेल्या गड-किल्ल्यांचे महत्त्व जगाच्या नकाशावर ठसविण्यासाठी आणि पुढील पिढ्यांपर्यंत त्याचा वारसा पोहोचवण्यासाठी एक आगळा-वेगळा व प्रेरणादायी उपक्रम 'दुर्गोत्सव' आयोजित केला आहे. विशेषतः दिवाळी सणाच्या निमित्ताने हा उपक्रम विश्वविक्रम करण्याचा संकल्प घेऊन साकारला जात आहे.
▪️उपक्रमाचे स्वरूप-
महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचा आणि शौर्याचा इतिहास सांगणारे गड-किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. या वैभवाचे दर्शन घडवण्यासाठी लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी एकत्र येऊन आपल्या घरी, अंगणात किंवा सोसायटीच्या आवारात गड-किल्ल्यांची हुबेहूब मातीची प्रतिकृती (किल्ला) तयार करायची आहे.
▪️सहभाग आणि विश्वविक्रम-
किल्ल्याची प्रतिकृती: नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असलेल्या 12 प्रमुख किल्ल्यांपैकी (उदा. रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड इत्यादी) कोणत्याही एका किल्ल्याची प्रतिकृती तयार करायची आहे. या प्रतिकृतीचा आकार कमीत कमी दोन फूट असावा, जास्तीत जास्त कितीही असू शकतो.
सेल्फी आणि नोंदणी: किल्ला तयार झाल्यावर, सहभागी व्यक्तीने त्या किल्ल्याच्या प्रतिकृतीसोबत एक सेल्फी काढायची आहे. ही प्रतिकृती व सेल्फी 'दुर्गोत्सव' च्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करायचा आहे.
विश्वविक्रमाचे लक्ष्य: मोठ्या संख्येने नागरिकांनी यात सहभागी होऊन किल्ले प्रतिकृती तयार करणे आणि त्याची सेल्फी पाठवून छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना देणे, यातून एका विश्वविक्रमाची नोंद करण्याचे ध्येय 'अमृत' संस्थेने ठेवले आहे.
▪️प्रोत्साहन आणि लाभ:
या स्तुत्य उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचे अभिनंदन पत्र दिले जाईल. 'अमृत विद्या' या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मवरील शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास व त्यातून आजच्या काळात घेण्याजोगे धडे या विषयावरील प्रशिक्षण निशुल्क उपलब्ध करून दिले जाईल.
▪️अमृतचा उद्देश:
या उपक्रमातून केवळ किल्ले बनवून विश्वविक्रम करणे हाच उद्देश नाही, तर गड-किल्ल्यांच्या माध्यमातून स्वराज्य, शौर्य आणि त्याग या मूल्यांची जाणीव तरुण पिढीला करून देणे, महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाचे स्मरण करणे आणि गड-कोटांचे वैभव जगाच्या पातळीवर पोहोचवणे हा 'अमृत' संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
दि. 18 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत फोटो अपलोड करता येणार असून, सहभागी प्रत्येकास मुख्यमंत्री महोदयांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार या दुर्गोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा जागतिक सन्मान साजरा करुया आणि यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने गौरवदिवाळी बनवूया, असे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी केले.