मतमोजणीत पारदर्शकता आणि अचूकता ठेवा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule19 Dec 25 person by visibility 83 categoryराज्य
▪️ मिरवणुक व रॅलीबंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करा
▪️ मतमोजणी केंद्राजवळ एसओपीनुसार नियोजन करा
▪️ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सूचना
कोल्हापूर : नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान कोणतीही तांत्रिक किंवा प्रशासकीय चूक होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ऑनलाइन बैठकीतून सर्व १३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, मतमोजणी प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवून ठेवणे ही प्रशासनाची मुख्य जबाबदारी आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करूनच प्रत्येक फेरीची मोजणी पूर्ण करावी. मतमोजणी केंद्रावर टेबलांची मांडणी करताना उमेदवारांच्या प्रतिनिधींना ईव्हीएममधील (EVM) मते स्पष्ट दिसतील, अशी व्यवस्था करावी, असे त्यांनी सांगितले. तसेच, प्रत्येक फेरीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणि उमेदवारांच्या स्वाक्षरी घेतल्यावरच पुढील फेरी सुरू करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शनिवारी योग्य पद्धतीने तालीम करण्यात येणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने मतमोजणी केंद्रावर त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनासोबत योग्य समन्वय साधून नियोजन करा, असे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. केंद्राच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहील व संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येईल. केवळ अधिकृत पास असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल, तसेच केंद्रात मोबाईल नेण्यास सक्त मनाई असेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बंदी आदेश आणि २०० मीटरच्या सर्व नियमांची मतमोजणी परिसरात अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले. तांत्रिक बिघाड उद्भवल्यास तत्काळ ईव्हीएम तज्ज्ञांची मदत घ्यावी. निकाल प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी लाऊडस्पीकरवरून वेळोवेळी घोषणा करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, विजयोत्सवाच्या नावाखाली कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. विजयी मिरवणुक काढण्यास बंदी घालण्यात आली असून, या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
या बैठकीला सहआयुक्त जिल्हा नगरप्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, निवडणूक निर्णय अधिकारी जयसिंगपूर मोहिनी चव्हाण तसेच ऑनलाइन पद्धतीने इतर सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.





