शिवाजी विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ बुधवारी प्रख्यात संशोधक डॉ. जी. सतीश रेड्डी प्रमुख पाहुणे
schedule19 Dec 25 person by visibility 87 categoryशैक्षणिक
▪️अक्षय जहागीरदार यांना राष्ट्रपती सुवर्णपदक; आर्या देसाई यांना कुलपती सुवर्णपदक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ६२ वा दीक्षान्त समारंभ येत्या बुधवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला असून भारताचे प्रख्यात संरक्षण व अवकाश संशोधक डॉ. जी. सतीश रेड्डी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी असतील; तर प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव प्रमुख उपस्थित असतील. यंदाच्या दीक्षान्त समारंभात एकूण ४९,९०२ स्नातक पदवी घेणार आहेत. समारंभानिमित्त विद्यापीठात ग्रंथदिंडी, ग्रंथ महोत्सव आदी उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ही माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.
डॉ. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये क्रीडा, बौद्धिक व कला क्षेत्र तसेच एनसीसी, एनएसएस यांमधील गुणवत्ता तसेच व्यक्तीमत्त्व, शारीरिक आरोग्य, भाषा शुद्धता, सर्वसाधारण ज्ञान, वागणूक व नेतृत्वगुण यामध्ये आदर्श ठरल्याबद्दल राज्यशास्त्र अधिविभागाचे विद्यार्थी अक्षय अरुण नलवडे-जहागीरदार यांना विद्यापीठाचे राष्ट्रपती सुवर्णपदक जाहीर करण्यात आले आहे. तसेच, मार्च २०२५ मध्ये सर्व एम.ए. परीक्षांमधून ‘मानसशास्त्र’ विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल आर्या संजय देसाई (हुपरी) यांना कुलपती सुवर्णपदक जाहीर करण्यात आले आहे.
दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. जी. सतीश रेड्डी हे चार दशकांहून अधिक काळ भारताच्या संरक्षण संशोधन व विकास आणि तंत्रज्ञान नेतृत्व क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या मोलाच्या योगदानासाठी ते सर्वदूर ओळखले जातात. सध्या ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे (NSAB) सदस्य, आंध्र प्रदेश शासनाचे मानद सल्लागार (कॅबिनेट दर्जा) तसेच एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव, डी.आर.डी.ओ.चे अध्यक्ष तसेच केंद्रीय संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार अशी अत्यंत जबाबदारीची पदे भूषविली आहेत. समारंभात ते स्नातकांना उद्देशून दीक्षान्त भाषण करतील.
शिवाजी विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभानिमित्त सलग १८ व्या वर्षी ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २३ ते २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या या महोत्सवात नामवंत भारतीय व परदेशी कंपनीचे प्रकाशक, पुस्तक विक्रेते, डेटाबेस पॅकेज, डिजीटल ग्रंथ, उपाहारगृह इत्यादींचे ४० स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. या निमित्त दरवर्षीप्रमाणे २३ डिसेंबरला ग्रंथदिंडी काढण्यात येईल. सकाळी ७.३० वाजता कमला महाविद्यालयात कुलगुरू डॉ. गोसावी यांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन होईल. तेथून जनता बझार, राजारामपुरी मेन रोड, आईचा पुतळा, सायबर चौक, शिवाजी विद्यापीठ गेट क्र. ६ या मार्गे दिंडीचे राजमाता जिजाऊ साहेब सभागृहातील दीक्षान्त सभा मंडपात आगमन होऊन तेथे विसर्जन करण्यात येईल. त्यानंतर सकाळी १० वाजता कुलगुरूंच्या हस्ते विद्यापीठाच्या अॅनेक्स इमारत प्रांगणात ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यानंतर राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम होतील. ग्रंथमहोत्सवातील स्टॉल दोन्ही दिवशी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहतील.
▪️यंदा ४९,९०२ स्नातक घेणार पदवी; मुलींचे प्रमाण ५७ टक्के
यंदाच्या दीक्षान्त समारंभात पदवी प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानव्यविद्या आणि आंतरविद्याशाखा या चार विद्याशाखांच्या मिळून एकूण ४९,९०२ स्नातकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये विद्यार्थिनींची संख्या २८,५१३ (५७.१४%) इतकी लक्षणीय आहे. १६,१५९ स्नातक प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी घेणार आहेत, तर ३३७४३ स्नातक पोस्टाने पदवी घेणार आहेत. दीक्षान्त समारंभ झाल्यानंतर स्नातकांना त्यांची प्रमाणपत्रे त्यांच्या नॅशनल ॲकॅडेमिक डिपॉझिटरी अकाऊंटमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.





