क्रीडा स्पर्धेतून नवनवीन कौशल्ये आत्मसात करा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule19 Dec 25 person by visibility 62 categoryराज्य
▪️दिव्यांग मुलांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेस उत्साहात सुरुवात
कोल्हापूर : क्रीडा स्पर्धेत इतर खेळाडूंसोबत खेळताना किंवा त्यांचे खेळ पाहताना अनेक अनुभव येतात. अशा वेळी त्यांच्याकडील नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले.
जिल्हा परिषद कोल्हापूरच्या 'जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालया'मार्फत पोलीस परेड ग्राउंडवर या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त पारितोष कंकाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, कृषी विकास व प्रभारी समाजकल्याण अधिकारी राजेंद्र माने, कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.) अर्जुन गोळे, प्रभारी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुवर्णा सावंत आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या साधना कांबळे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याला मोठी क्रीडा परंपरा लाभली असून, दिव्यांग खेळाडूही तीच परंपरा समर्थपणे जोपासत आहेत. क्रीडा स्पर्धेत सहभागी होणे, हीच सर्वात मोठी गोष्ट आहे; त्यामुळे सहभाग नोंदवून तुम्ही अर्धी स्पर्धा आधीच जिंकली आहे. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही पोलीस परेड ग्राउंडवर सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आहे. या स्पर्धेतून गुणानुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणारे विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरतील, त्यांचा आपण विशेष सन्मान करूच; परंतु आमच्या दृष्टीने सहभागी होणारे तुम्ही सर्वजण सन्मानास पात्र आहात. दिवसभर आनंदाने या स्पर्धांमध्ये सहभागी व्हा आणि येथील आठवणी वर्षभर आपल्या शाळेत जपून ठेवा.
प्रास्ताविक करताना वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या साधना कांबळे यांनी सांगितले की, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेचा विकास करणे, त्यांचे मानसिक बळकटीकरण करणे आणि त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करून त्यांना मुख्य प्रवाहात सन्मानाने संधी देणे, हा या स्पर्धांचा मुख्य उद्देश आहे. या क्रीडा स्पर्धेत धावणे, लांब उडी, गोळाफेक, स्पॉट जंप आणि बुद्धिबळ यांसारख्या विविध खेळांचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाची सुरुवात क्रीडा ज्योत प्रज्वलित करून आणि क्रीडा शपथ घेऊन करण्यात आली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचे रीतसर उद्घाटन केले. या जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील १८ शाळांमधील एकूण ४५२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





