संविधान जनजागृती प्रश्नमंजुषाचे आयोजन
schedule19 Dec 25 person by visibility 50 categoryराज्य
▪️प्रथम पुरस्कार १ लाख रुपये, ३१ डिसेंबर पर्यंत नोंदणी कालावधी, ८ वी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संधी
कोल्हापूर : संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त, अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या पुढाकाराने आयोजित संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा - २०२५ हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाचे महत्त्व, त्यातील मुलभूत अधिकार व कर्तव्ये याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना संविधानाची समज वाढविण्यासाठी, तज्ज्ञ मार्गदर्शन, अनुभवात्मक शिक्षण आणि अभ्यास साहित्य प्रदान करण्याच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जागरूक, उत्तरदायी आणि सशक्त नागरिक होण्याची संधी मिळणार असल्याचे आयोगाचे उपाध्यक्ष ॲड धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.
नागपूर येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, संचालक शिक्षण, अवर सचिव अल्पसंख्याक विकास, सह सचिव इतर मागासवर्ग विभाग, सह संचालक उच्च शिक्षण, सह संचालक तंत्र शिक्षण महाराष्ट्र नॅशनल लॉ विद्यापीठ, राज्यातील सर्व जिल्हा माहिती अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
▪️अशी असणार स्पर्धा
संविधान जागृती प्रश्नमंजुषा २०२५ महाराष्ट्र राज्यातील ८ वी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली गेली आहे. ही स्पर्धा पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात असेल. विद्यार्थी www.yuvacareer.com या संकेतस्थळावर भेट देऊन कार्यक्रमाची सविस्तर माहिती, नोंदणी प्रक्रिया, ऑनलाईन प्रशिक्षण, तसेच प्रश्नमंजुषेची सर्व माहिती मिळवू शकतात.
▪️भाषा निवडः
संविधान जागृती प्रश्नमंजुषा २०२५ ही तीन भाषांमध्ये (मराठी, इंग्रजी, हिंदी) आयोजित केली जाईल. विद्यार्थी इच्छेनुसार कुठलीही एक भाषा निवडू शकतात.
▪️शुल्कः
प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ९९ रुपये शुल्क निश्चित केले गेले आहे. शाळा, महाविद्यालये, वसतिगृह आणि आश्रमशाळा यांना हे शुल्क भरावे लागेल. फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइनः सर्व प्रक्रिया www.yuvacareer.com संकेतस्थळावर ऑनलाइन पार पडणार. अधिकृत वेबसाइटवरूनच तपशील व अद्यतनेः उपलब्ध राहतील.फेक लिंक आणि अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका, असे ते म्हणाले.
पुरस्कार
प्रथम पुरस्कार १ लाख रुपये रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र, द्वितीय पुरस्कारः ५१ हजार रुपये (रोख रक्कम),चषक व प्रमाणपत्र, तृतीय पुरस्कारः ११ हजार (रोख रक्कम), चषक व प्रमाणपत्र तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान केले जाईल. हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचा सम्मान करेल आणि त्यांना भविष्यातील कार्यात प्रेरणा देईल.
नोंदणी कालावधी व परीक्षा
३१ डिसेंबर पर्यंत नोंदणी कालावधी आहे. नोंदणी फक्त www.yuvacareer.com या अधिकृत संकेतस्थळावर केली जाऊ शकते. मॉक टेस्ट: २० जानेवारी २०२६, पहिली फेरी क्विझः २२ जानेवारी २०२६ तर अंतिम क्विझः २६ जानेवारी २०२६ (प्रजासत्ताक दिन) अशी असणार आहे.





