३६५ दिवसात १२०० पेक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रम : मंत्री ॲड.आशिष शेलार
schedule22 Oct 25 person by visibility 93 categoryराज्य
▪️आशा भोसले व सुधीर फडके यांच्या बहारदार गीतांची 'दीप उत्सव दिवाळी पहाट'
मुंबई : राज्यभर ३६५ दिवसांत १२०० पेक्षा अधिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जनमानसात पोहोचविण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने दिवाळीच्या स्वागतासाठी “दीप उत्सव दिवाळी पहाट” हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम कालिदास नाट्यगृह, मुलुंड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात आशा भोसले व सुधीर फडके (बाबूजी) यांच्या अविस्मरणीय गीतांची स्वरमयी मैफल रंगली.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक अजित परब, अभिषेक नलावडे, गायिका शाल्मली सुखटणकर आणि प्राजक्ता सातर्डेकर यांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी यांनी केले, तर संगीत संयोजन दीपक कुमठेकर आणि अमित गोठीवरेकर यांचे होते.
या प्रसंगी आमदार मनोज कोटक, नगरसेवक प्रभाकर शिंदे, ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष दीपक दळवी तसेच नगरसेविका स्मिता कांबळे उपस्थित होते. मुलुंडकर रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.