कोल्हापुरात पाडव्यानिमित्त रंगल्या म्हशींच्या सौंदर्य स्पर्धा
schedule22 Oct 25 person by visibility 86 categoryसामाजिक

कोल्हापूर : दिवाळी पाडव्या निमित्त कोल्हापुरात परंपरेनुसार साजरा होणारा म्हशींचा सौंदर्य सोहळा यंदाही रंगतदार पद्धतीनं साजरा झाला. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील भारतवीर मित्र मंडळातर्फे आयोजन करण्यात आले होते.
प्रत्येक मालकाने आपल्या म्हशींना आकर्षकरित्या सजवून स्पर्धेच्या मैदानात उतरवले होते. काही म्हशींवर विविधरंगी नक्षीकाम तर काहींच्या अंगावर सामाजिक संदेश रेखाटले होते.
सजवलेल्या म्हशींना मैदानात आणत म्हशी पळवण्याच्या शर्यती झाल्या. मोटरसायकलमधून येणाऱ्या आवाजामागं म्हशी पळवत तरुणांनी आपली कला आणि कौशल्यं दाखवले.
या पारंपरिक कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर आदी लोकप्रतिनिधींनी भेट देऊन उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी आ. सतेज पाटील यांनाही दुचाकी मागून म्हैस पळवण्याचा मोह आवरता आला नाही.
कसबा बावडासह शनिवार पेठेतील गवळी गल्ली, पंचगंगा घाट, सागरमाळ आणि पाचगाव इथंही अशा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. म्हशींचा थाट-माट पाहण्यासाठी आणि शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती.