SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी घेतले लालबागच्या गणेशाचे दर्शनउत्सव काळात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ७ जणांचा मृत्यूडॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये गौरी गीते स्पर्धा उत्साहातकेंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतले गणेशाचे दर्शनसारथी, उपकेंद्र, कोल्हापूर : एक विकासाचे आणि सशक्तीकरणाचे केंद्रकेआयटी च्या प्रथम वर्षाची सुरुवात ‘विशेष इंडक्शन’ ने संपन्न ; विविध मान्यवर व्यक्तींकडून विद्यार्थ्यांचे प्रबोधन खडतर परिश्रम घेऊन यशस्वी व्हा : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकाळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील भ्रष्टाचाराची शहानिशा करण्यासाठी एसआयटी चौकशी समिती नियुक्तची मागणी करणार कोल्हापुरातून सकल मराठा समाजातर्फे जीवनावश्यक वस्तू मुंबईस पाठवणारदूध उत्पादकांच्या श्रमामुळे ‘गोकुळ’ची प्रगती : नविद मुश्रीफ; गोकुळ दूध संघाची राधानगरी तालुका संपर्क सभा

जाहिरात

 

सारथी, उपकेंद्र, कोल्हापूर : एक विकासाचे आणि सशक्तीकरणाचे केंद्र

schedule31 Aug 25 person by visibility 102 categoryराज्य

महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत कार्यरत असलेली छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) ही एक स्वायत्त संस्था आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ नुसार २५ जून २०१८ रोजी या संस्थेची स्थापना झाली, तर सारथी उपकेंद्र, कोल्हापूरचे कार्यालय २६ जून २०२१ पासून सुरू झाले आहे. या उपकेंद्राने अल्पावधीतच कोल्हापूर आणि आसपासच्या सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील मराठा-कुणबी व त्यांच्याशी संबंधित समाजातील तरुण-तरुणींच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे कार्य केले आहे. विकासाच्या अनेक पैलूंना स्पर्श करत, सारथी कोल्हापूर उपकेंद्राने शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला एक नवी दिशा दिली आहे.

कोल्हापूर उपकेंद्राच्या पायाभूत सुविधांचा विचार करता, कार्यालयाच्या इमारतीसह इतर बांधकामांसाठी १.८५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. १७६.३८ कोटी रुपयांच्या या बांधकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, तांत्रिक मान्यतेनंतर २० फेब्रुवारी २०२४ रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. कार्यालयीन इमारत, संग्रहालय व अभ्यासिका, मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, तसेच भोजनगृह यांसारख्या इमारतींचे बांधकाम वेगाने सुरू आहे. विशेषतः, मुला-मुलींच्या वसतिगृहाचे काम दहाव्या मजल्यापर्यंत प्रगतीपथावर असून, लवकरच या सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतील.

सारथीच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे 'महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा विभाग'. या विभागामार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) या दोन्ही परीक्षांसाठी विद्यार्थ्याना सर्वंकष मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य पुरवले जाते. दिल्ली आणि पुणे येथे प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत, तसेच मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या तयारीसाठी विशेष सहाय्य दिले जाते. २०२० ते २०२३ या वर्षांमध्ये यूपीएससी परीक्षेत संस्थेचे अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत, ज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर, राज्य सेवा, अभियांत्रिकी सेवा, विधी सेवा यांसारख्या विविध एमपीएससी परीक्षांसाठीही मोफत प्रशिक्षण, विद्यावेतन आणि इतर खर्च भागवला जातो. बँक, स्टाफ सिलेक्शन कमिशन, एमएच-सेट , यूजीसी नेट यांसारख्या इतर स्पर्धा परीक्षांसाठीही सारथीमार्फत प्रशिक्षण दिले जाते. या प्रयत्नांमुळे २०२० ते २०२३ या काळात ७०० हून अधिक विद्यार्थी एमपीएससी परीक्षेत यशस्वी झाले, ज्यात कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग आहे.

'कौशल्य विकास विभागा'ने युवकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. 'छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम (सीएसएमएस -डीईइपी)' या अंतर्गत महाराष्ट्र ज्ञानमहामंडळ (एमकेसीएल) च्या सहकार्याने १८ ते ४५ वयोगटातील युवकांना सहा महिन्यांचे संगणक आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण दिले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. 'महाराणी सईबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण' मधून बेकरी उत्पादने, दुग्धव्यवसाय, मसाले निर्मिती आणि गारमेंट मेकिंग यांसारख्या क्षेत्रांत महिलांना प्रशिक्षित केले जाते. 'श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी इंडो जर्मन टूल रूम (आयजीटीआर) कौशल्य विकास प्रशिक्षण' अंतर्गत तांत्रिक कौशल्यावर आधारित २४ अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. 'सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास (इनक्युबेशन) उपक्रम' पदवीधर युवकांना उद्योजक बनण्यासाठी २५,००० रुपये प्रति महिना विद्यावेतन देऊन सहाय्य करतो. 'सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण' मधून १० वी उत्तीर्ण युवकांना वाहन चालक प्रशिक्षण दिले जाते. 'सरसेनापती वीर बाजी पासलकर सारथी संगणक शिकता-शिकता कमवा योजना' हा एक अभिनव उपक्रम आहे, ज्यात विद्यार्थी प्रशिक्षण घेतानाच पैसे कमवून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात.

'शिक्षण विभागा'ने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. 'छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना' राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पण केंद्रीय शिष्यवृत्ती न मिळालेल्या ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना चार वर्षांसाठी वार्षिक ९,६०० रुपये शिष्यवृत्ती देते. 'छत्रपती शाहू महाराज तालुकास्तरीय निबंध स्पर्धा' शाहू महाराजांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाते. 'करिअर मार्गदर्शन व समुपदेशन शिबिरां'मधून १० वी च्या विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यासाठी मदत केली जाते. देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी 'डॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती' आणि परदेशी शिक्षणासाठी 'महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती' या योजनांद्वारे शिक्षण शुल्क, निवास आणि भोजन खर्चाची १००% प्रतिपूर्ती केली जाते. 'छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती योजना' संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करते.

सारथीने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. 'नरवीर तानाजी मालुसरे ऐतिहासिक दस्तऐवज जतन योजने'अंतर्गत छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील अप्रकाशित कागदपत्रे, आदेश आणि हुकूमनामे डिजिटल स्वरूपात जतन केले जात आहेत. 'सर सेनापती हंबीरराव मोहिते सारथी मोडी लिपी प्रशिक्षण' या योजनेतून विद्यार्थ्यांना मोडी लिपीचे मोफत प्रशिक्षण देऊन इतिहास संशोधनास हातभार लावला जात आहे, ज्यात प्रति विद्यार्थी १०,००० रुपये विद्यावेतन दिले जाते.

'कृषी विभागाने' शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी 'सारथी शेतकरी मावळा कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण' सुरू केले आहे. यामध्ये ड्रोन प्रशिक्षण, मधमाशीपालन, मुरघास निर्मिती व पशुधन संगोपन, तसेच अल्प मुदतीचे कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण (उदा. शास्त्रीय दुग्ध व्यवस्थापन, फळ व भाजीपाला प्रक्रिया) समाविष्ट आहे.

भविष्यासाठी सारथी उपकेंद्राने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम प्रस्तावित केले आहेत. यामध्ये जिल्हास्तरीय मनुष्यबळ उपलब्ध करणे, रिक्त पदे भरणे, पुनर्वसित प्रकल्पग्रस्तांमधील युवक-युवतींना सीएसएमएस -डीईईपी अंतर्गत प्रशिक्षण देणे आणि एचआयवी बाधित युवक-युवती, एकल महिला, विधवा महिला व त्यांच्या मुलांसाठी महाराणी सईबाई योजनेचा विस्तार करणे ही उद्दिष्टे आहेत. पर्यटन स्थळांवर आदरातिथ्य प्रशिक्षण, 'सारथी महिला उद्योजिका हब' तयार करून महिला उद्योजिकांना बाजारपेठेशी जोडणे, तसेच छत्रपती शाहू महाराजांचे ऐतिहासिक दस्तऐवज प्रकाशित करून सामान्य लोकांसाठी उपलब्ध करणे हेही प्रस्तावित आहे. 'सारथी शिव-राज्याभिषेक अभियान ३५०' अंतर्गत ७५ किल्ल्यांवर सीडबॉल लागवड करण्यात आली, तर 'सरदार हिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रमा'तून ३८ किल्ले आणि दोन शिवरायांच्या पुतळ्यांच्या परिसरातील स्वच्छता मोहीम राबवण्यात आली, ज्यात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

सारथी संस्थेने स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना मोठे यश मिळवून दिले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) परीक्षेत सारथी संस्थेचे २०२० ते २०२४ या काळात एकूण १२८ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यामध्ये २०२० साली २२, २०२१ साली १७, २०२२ साली २२, २०२३ साली ३४ आणि २०२४ साली ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात आयएएस, आयपीएस आणि आयआरएस सेवांमधील यशस्वी उमेदवारांचा समावेश आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षांमध्येही सारथीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. २०२० ते २०२३ या कालावधीत एकूण ७४७ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत, ज्यात १६७ वर्ग १ आणि ५८० वर्ग २ अधिकारी आहेत. राज्यसेवा, कृषी सेवा, वन सेवा आणि अभियांत्रिकी सेवांसारख्या विविध परीक्षांमध्ये हे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. हे आकडे संस्थेच्या प्रभावी प्रशिक्षणाचे उत्तम उदाहरण आहे.

सारथी उपकेंद्र, कोल्हापूर हे केवळ योजना राबवणारे केंद्र नसून, ते सामाजिक जागृती आणि विकासाचे एक प्रेरणास्थान आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर, 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम आणि विविध महाविद्यालयांमध्ये योजनांची माहिती देणाऱ्या भेटींच्या माध्यमातून सारथी समाजात सक्रिय सहभाग घेत आहे. एकूणच, सारथी उपकेंद्र कोल्हापूर हे मराठा-कुणबी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून, शिक्षण, कौशल्य आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण एक सशक्त समाज घडवण्याच्या दिशेने कार्यरत आहे.

✍️ सचिन अडसूळ, 
जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes