स्वयंसेवी संस्थांनी आपल्या कक्षा विस्तारल्या पाहिजेत ; डॉ. महेश ठाकूर यांचे प्रतिपादन
schedule10 Jan 26 person by visibility 135 categoryसामाजिक
🔹शिवाजी विद्यापीठात व्यवस्थापन विकास कार्यक्रमाचे आयोजन
कोल्हापूर, दि. १० जानेवारी : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंसेवी संस्था क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून, त्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांनीही काळानुरूप आपल्या कार्यकक्षा विस्तारल्या पाहिजेत, असे प्रतिपादन पुणे येथील कर्वे समाज सेवा संस्थेचे संचालक प्रा. डॉ. महेश ठाकूर यांनी केले. प्रकल्प क्षेत्रातील प्रत्यक्ष गरजा, स्थानिक संसाधनांची उपलब्धता आणि समाजातील बदलते प्रश्न यांचा सखोल अभ्यास करून नावीन्यपूर्ण व परिणामकारक प्रकल्पांची उभारणी करणे आज अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ते शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभाग आणि सामाजिक समावेशन अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान योजने अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘बिगर शासकीय संस्थांचे वित्तीय व्यवस्थापन व लेखांकन' या विषयावरील व्यवस्थापन विकास कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रा. डॉ. के. व्ही. मारुलकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी श्री. अविनाश भाले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
डॉ. ठाकूर पुढे म्हणाले की, बिगर शासकीय संस्थांनी केवळ शासनाकडून किंवा देणगीदारांकडून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यावर अवलंबून न राहता, कॉर्पोरेट क्षेत्राकडून सी. एस.आर. (कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व) कायद्यांतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी परस्पर सहकार्य वाढवून कॉर्पोरेट कंपन्यांचे व्यवस्थापन, कंपनी सचिव तसेच सनदी लेखापाल यांच्याशी प्रभावी संपर्क व सहसंबंध निर्माण करणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सामाजिक माध्यमांद्वारे संस्थांच्या कार्याचा प्रचार व प्रसार केल्यास संस्थांची विश्वासार्हता वाढून निधी संकलनालाही चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सनदी लेखापाल अनिल जाधव यांनी ‘बिगर शासकीय संस्थांचे लेखांकन' या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. स्वयंसेवी संस्थांना विविध स्रोतांमधून प्राप्त होणारे आर्थिक सहाय्य, अनुदाने, देणग्या यांची योग्य नोंद कशी ठेवावी, ताळेबंद व आर्थिक विवरणपत्रे कशी तयार करावीत, तसेच कायदेशीर व लेखापरीक्षणाच्या बाबी याविषयी त्यांनी सखोल माहिती दिली. या सत्राचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. के. व्ही. मारुलकर यांनी भूषविले.
कार्यक्रमाच्या तिसऱ्या व चौथ्या सत्रात अनुक्रमे ‘अनुदान व्यवस्थापन व दस्तऐवजीकरण’ आणि ‘वित्तीय उपयोजन व आर्थिक अहवाल’ या विषयांवर पुणे येथील डिग्निटी अकॅडमीया संस्थेचे श्री. चंदन देसाई यांनी मार्गदर्शन केले. अनुदान प्राप्त करताना आवश्यक असलेली कागदपत्रे, अहवालांची मांडणी, तसेच निधीचा योग्य व पारदर्शक वापर कसा करावा याबाबत त्यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. या सत्रांना श्री. अविनाश भाले व प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी अध्यक्षस्थान भूषविले.
या व्यवस्थापन व विकास कार्यक्रमात विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी, संशोधक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. तेजपाल मोहरेकर, डॉ. किशोर खिलारे, शरद पाटील, श्री. टिपुगडे, भरत रावण, चारुशिला तासगावे, सौरभ पवार, हरीश कांबळे, ज्ञानेश्वरी शिंदे, सामी मुल्ला, तुषार पाटील, विक्रम कांबळे आदींनी मोलाचे योगदान दिले.

