महायुतीच्या विजयाचे भगवे वादळ राज्यभर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
schedule11 Jan 26 person by visibility 147 categoryराजकीय
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात लोकाभिमुख कारभार करत असून, जनता या कामास बळ देत आहे. महायुतीच्या विजयाचे भगवे वादळ राज्यभर उठले असून, विरोधकांचा त्यात सुपडासाफ होईल. असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जाहीर सभेत व्यक्त केला.
रामाला १४ वर्षाचा वनवास भोगावा लागला. यापेक्षा एक वर्षे अधिक म्हणजे १५ वर्षे कांग्रेसच्या भ्रष्टाचाराने कोल्हापूरकर त्रस्त झाले आहेत, असा आरोप शिंदेसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. पंधरा वर्षे झोपा काढलेल्या विरोधकांची आता झोप उडाल्याची टीकाही त्यांनी केली.
सरकारला लाडक्या बहिणींनी पाठबळ दिल्याने पोटशूळ उठलेले कांही लोक ही योजना बंद होणार अशा अफवा पसरवत आहेत. परंतू ही योजना बंद होणार नाही, असेही ते म्हणाले.दिलेला शब्द पाळणारे सरकार आहे. आम्ही विकासातील मलई खाणारे नाही. विकासाची मलई वाटणारे आहोत. साडेतीन वर्षे महायुतीच्या सरकारने राज्यात चांगले काम केले आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करीत आहे. कोल्हापुरात महायुतीसाठी वातावरण पोषक आहे.
महायुतीच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी चौकात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक, सत्यजित कदम, माजी आमदार जयश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेस जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, सत्यजित जाधव , ओंकार जाधव, शारंगधर देशमुख आदींसह सर्व उमेदवार उपस्थित होते.
◼️राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा आणि ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सभेनंतर त्यांच्या वाहनाचे सारथ्य युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतूराज क्षीरसागर यांनी केले.

