लिंगायत समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणणार : इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे
schedule14 Dec 25 person by visibility 51 categoryराज्य
नागपूर : लिंगायत समाजातील खुल्या वर्गातील समाजाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्यात येणार असल्याची माहिती इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली.
सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी म.वि.प. नियम ९७ अन्वये विधान परिषदेत या विषयी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत सदस्य अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला.
मंत्री सावे यांनी सांगितले, जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ मार्फत लिंगायत समाजाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. लिंगायत समाजातील काही उपजाती इतर मागासवर्ग प्रवर्गात तर काही उपजाती विशेष मागास प्रवर्गात समाविष्ट आहेत. या व्यतिरिक्त लिंगायत समाजातील खुल्या प्रवर्गातील समाजाला शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी उपकंपनी स्थापन करण्याऐवजी स्वतंत्र महामंडळ स्थापनेबाबत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे मंत्री सावे यांनी अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात सांगितले.




