कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये विक्रमी उत्साह : शेकडो इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उत्साहात
schedule14 Dec 25 person by visibility 128 categoryराजकीय
▪️पारदर्शक प्रक्रियेने विकासाभिमुख नेतृत्वाची निवड, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयात आज आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती अत्यंत उत्साहात पार पडल्या. यावेळी खासदार धनंजय महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव आणि जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया राबविण्यात आली.
भाजपकडे तब्बल ३०० हून अधिक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीसाठी मागणी केली असून, या विक्रमी प्रतिसादातून पक्षाच्या वाढत्या लोकप्रियतेचे आणि जनमानसातील विश्वासाचे दर्शन घडले. या मुलाखतींदरम्यान, प्रत्येक इच्छुक उमेदवाराची ओळख, त्यांच्या प्रभागातील सद्यस्थिती आणि राजकीय इतिहास याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली. पक्षाने नेहमीच पारदर्शकतेला आणि योग्य नेतृत्वाला प्राधान्य दिले आहे. प्रत्येक उमेदवाराची क्षमता आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी पाहूनच निर्णय घेतला जाईल, जेणेकरून कोल्हापूर शहराच्या विकासाला नवी गती मिळेल. हा अहवाल लवकरच प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असून, त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील उमेदवारी वाटपाबाबत अंतिम निर्णय घेतील.
या मुलाखतीप्रसंगी शहरातील अनेक प्रमुख व्यक्तींनी आपली उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थिती लावली.
संपूर्ण वातावरणात उत्साहाचे, चैतन्याचे आणि सकारात्मकतेचे सूर उमटले.
पक्षाने नेहमीच प्रत्येक कार्यकर्त्याला सक्षम करण्याचे कार्य केले आहे, आणि ही प्रक्रिया त्याच दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पक्षाचे कार्य वेगाने पुढे जात आहे आणि ते प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
या सर्व मुलाखतींमधून इच्छुक उमेदवारांचे सखोल सर्वेक्षण केले जाणार असून, त्यानंतरच पुढील निर्णयावर शिक्कामोर्तब होईल.




