SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
टेक वारीचा ऑनलाईन प्रारंभ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या एआय प्रकल्पांचे कौतुकमाध्यमकर्मींनी माध्यमांचा जबाबदारीने वापर करावा: डॉ. अशोक चौसाळकर; डॉ. आलोक जत्राटकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशनआषाढी एकादशी निमित्त नंदवाळ दिंडीत वारकऱ्यांना ‘गोकुळ’तर्फे सुगंधी दूध, हरीपाठ वाटपविठूनामाच्या गजरात पुईखडीतील रिंगण सोहळ्याने डोळ्यांचे फेडले पारणे“गिरगावच्या शाळेतील शिक्षकांमुळे मी घडलो” : सरन्यायाधीश भूषण गवई यांची शिक्षकांविषयी कृतज्ञतादिव्यांगांची आत्मसन्मानासाची धडपड, धडधाकटांना प्रेरणादायी : शीतल धनवडेबा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे : मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडेदर्जेदार वैद्यकीय शिक्षणासह रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफडीकेटीई येथे प्राध्यापक, स्टाफ यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न ‘गोकुळ’मध्ये सहकार मंत्रालय स्थापना सप्ताह, आंतरराष्ट्रीय सहकार दिन उत्साहात

जाहिरात

 

माध्यमकर्मींनी माध्यमांचा जबाबदारीने वापर करावा: डॉ. अशोक चौसाळकर; डॉ. आलोक जत्राटकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

schedule06 Jul 25 person by visibility 256 categoryसामाजिक

कोल्हापूर : माध्यम हे दुधारी असते, माध्यमकर्मींनी व्यापक सामाजिक हितासाठी त्याचा अत्यंत जबाबदारपूर्वक वापर केला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी काल (दि. ५) येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ हा भाग्यश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित होणारा मुक्तचिंतनपर ललित लेख संग्रह आणि ‘समाज आणि माध्यमं’ हे अक्षर दालन प्रकाशनातर्फे प्रकाशित होणारे माध्यमविषयक पुस्तक यांचा संयुक्त प्रकाशन सोहळा येथील राजर्षी शाहू सभागृहात झाला. त्यावेळी ‘समाज, माध्यमं आणि संविधानिक मूल्ये’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि डॉ. रघुनाथ कडाकणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

डॉ. चौसाळकर म्हणाले, संदेश प्रसार आणि अभिव्यक्तीसाठी प्राचीन आणि मध्ययुगीन काळातही माध्यमे होती; केवळ त्यांचे स्वरुप वेगळे होते. माध्यमे असल्यामुळेच भगवान बुद्ध, महंमद पैगंबर, शंकराचार्य यांचे संदेश सर्वदूर पसरले. पानिपतच्या लढाईतील पराभवाची बातमी महाराष्ट्रात पोहोचण्याला दोन महिने लागले. व्यापाऱ्यांच्या संदेशाच्या माध्यमातून ती येथपर्यंत आली. हे स्वरुप बदलत आता आधुनिक स्वरुपाला येऊन ठेपले आहे. स्वच्छ अभिव्यक्ती ही आजची गरज आहे. आद्य मराठी संपादक बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यासाठी आग्रही प्रतिपादन केले होते. भारतीय संविधानही त्याच अभिव्यक्तीची अपेक्षा नागरिकांकडून आणि माध्यमकर्मीकडून बाळगते. मात्र, आज समाजमाध्यमांच्या आगमनामुळे विद्वेषी, विखारी, भेदाभेदाला बळ देणाऱ्या खालच्या दर्जाच्या अभिव्यक्तींचे वाढते प्रमाण चिंताजनक आहेच; पण, देशहितालाही मारक आहे. त्यामुळे माध्यम आणि अभिव्यक्ती साक्षरता ही काळाची गरज आहे. त्यामध्येही माध्यमांना मोलाची भूमिका बजावण्याची संधी आहे.

डॉ. जत्राटकर यांची दोन्ही पुस्तके चांगली झाली असून येथून पुढील काळात त्यांच्याकडून अधिक चांगल्या निर्मितीची अपेक्षा त्यांचा शिक्षक म्हणून मी बाळगून आहे, असेही चौसाळकर म्हणाले.


प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, डॉ. आलोक जत्राटकर हे भोवतालाकडे संवेदनशीलतेने आणि वैज्ञानिक चिकित्सक नजरेतून पाहणारे व्यक्तीमत्त्व आहे. आपले दिवंगत शास्त्रज्ञ मित्र डॉ. भालचंद्र काकडे यांच्या स्मरणार्थ व्याख्यानमाला चालविण्याच्या त्यांच्या निरपेक्षभावातून या संवेदनशीलतेची प्रचिती येते. हीच संवेदनशीलता त्यांच्या लेखनातूनही पाझरताना दिसते.
यावेळी जत्राटकर यांच्या दोन्ही पुस्तकांवर राजाराम महाविद्यालयाचे इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ व ‘समाज आणि माध्यमं’ या दोन्ही पुस्तकांतून डॉ. जत्राटकर यांची दोन वेगवेगळी रुपे सामोरी येतात. पहिल्या पुस्तकामध्ये समाजातील, भोवतालातील छोट्या छोट्या घटना, प्रसंगांमध्ये मानवी मूल्यांचा आग्रह धरणारा समाजचिंतक दिसतो. भारतीय समाजात सौहार्द, समतेचा सहभाव निर्माण व्हावा, यासाठी शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा आणि संविधानिक मूल्यांच्या अंगिकाराचा आग्रह करणारा सहृदयी माणूस दिसतो. तर, ‘समाज आणि माध्यमं’ या पुस्तकाद्वारे माध्यमांचे एक सजग आणि जाणकार अभ्यासक म्हणून ते सामोरे येतात. भारतात झालेल्या टेलिकॉम्प्युटर क्रांतीनंतर गेल्या दोन-तीन दशकांत प्रसारमाध्यमांच्या जगतात झालेल्या घडामोडी, नवमाध्यमांच्या नवप्रवाहांनी त्यामध्ये केलेला हस्तक्षेप यांसह गेमिंग, ट्रोलिंग, ई-कॉमर्स, ऑनलाईन शिक्षण इत्यादींनी आपल्या समाजजीवनावर टाकलेला प्रभाव यांसह अनेक बाबींचा ऊहापोह अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि तपशीलवारपणे त्यांनी घेतलेला आढळतो.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, समाज आणि माध्यमं या पुस्तकातून डॉ. जत्राटकर यांनी नवमाध्यमांतील त्रुटींची अतिशय परखडपणे जाणीव करून दिलेली आहे. समाजाविषयीची चिंता, तळमळ त्यामध्ये आढळते. ते नकारात्मक नाहीत, पण सकारात्मक वापरासाठी, अभिव्यक्तीसाठी आग्रही आहेत. समाजाने त्यांची दखल घेऊन या माध्यमांचा सजग वापर करणे आवश्यक आहे. ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे या पुस्तकातील प्रत्येक लेखामधून जगण्याचे, जीवनाचे एक मूल्य त्यांनी सांगितले आहे. एक संवेदनशील लेखक, माणूस म्हणून ते वाचकांच्या हृदयाला हात घालतात.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकांना प्रस्तावना लिहीणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस आणि डॉ. रणधीर शिंदे यांचा प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते प्रकाशित पुस्तके प्रथम भेट देऊन विशेष गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे डॉ. जत्राटकर यांचे गुरू डॉ. अशोक चौसाळकर, ज्येष्ठ संपादक दिलीप लोंढे, संजय पाटोळे आणि डॉ. विजय चोरमारे यांचा कृतज्ञता सत्कार कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी डॉ. आलोक जत्राटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. भाग्यश्री कासोटे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले, तर अमेय जोशी यांनी आभार मानले.


कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. एन.डी. जत्राटकर, डॉ. सागर डेळेकर, डॉ. जगन कराडे, डॉ. बी.एम. हिर्डेकर, डॉ. जी.पी. माळी, डॉ. इस्माईल पठाण, डॉ. प्रवीण चौगुले, डॉ. डी.आर. मोरे, डॉ. व्ही.एम. पाटील, डॉ. रघुनाथ ढमकले, अॅड. अभिषेक मिठारी, नामदेवराव कांबळे, जी.बी. अंबपकर, अशोक चोकाककर, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. केदार मारुलकर, डॉ. विनोद ठाकूर देसाई, डॉ. गजानन राशिनकर, डॉ. अनमोल कोठडिया यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes