दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासह रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
schedule05 Jul 25 person by visibility 95 categoryराज्य

▪️कोल्हापूरची ‘मेडिकल हब’ म्हणून ओळख निर्माण करू : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
▪️शेंडा पार्कमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज आरोग्य संकुलाच्या पहिल्या स्लॅबचा शुभारंभ तर सीपीआरमधील अत्याधुनिक सेवा-सुविधांचेही लोकार्पण
कोल्हापूर : शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ११०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभे राहत असून सीपीआर अर्थात छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातही अनेक सुविधा अद्ययावत करण्यात आल्या आहेत. यातून कोल्हापूरसह संपूर्ण राज्यासाठी दर्जेदार वैद्यकीय शिक्षणासह रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील आरोग्य संकुलाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ आज करण्यात आला.
त्याचबरोबर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात (सीपीआर) नूतन अत्याधुनिक सेवा व सुविधांचाही लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी श्री. मुश्रीफ बोलत होते.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाचे आयुक्त अनिल भंडारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख उपस्थित होत्या.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ म्हणाले, गंभीर आजारासाठी जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाला पुणे-मुंबईला जाण्याची आवश्यकता भासणार नाही. मार्च २०२७ पर्यंत पूर्ण क्षमतेने वैद्यकीय नगरीतील सुसज्ज हॉस्पिटल उभे राहील. त्याचबरोबर येत्या दिवाळीपर्यंत सीपीआरमधील सर्व सुविधा नव्याने निर्माण होतील. सार्वजनिक आरोग्य मंत्री व मी स्वतः राज्यासह जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अद्ययावत करून एकूणच वैद्यकीय सेवेतील गुणवत्ता वाढवून, अगदी परदेशातील लोकही अशा सुविधांसाठी राज्यात येतील, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्वसामान्य विद्यार्थी गुणवत्तेवर आधारितच येत असतात. त्यामुळे येणाऱ्या सामान्य विद्यार्थ्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी शिक्षकांची भरतीही येत्या वर्षात तातडीने करण्याची प्रक्रिया शासन स्तरावरून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपल्या मनोगतात कोल्हापूर ज्या प्रकारे बदलत आहे, त्याच प्रकारे सीपीआर रुग्णालयही बदलत असल्याचे सांगून, एवढ्या चांगल्या आरोग्य सुविधा रुग्णांसाठी उभ्या राहत असून, यातून कोल्हापूरची नवी ओळख ‘मेडिकल हब’ म्हणून निर्माण होईल, असे आश्वासन दिले. एकीकडे चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण होत असताना, रुग्णांसाठी दर्जेदार सेवाही मिळाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली. शासकीय रुग्णालयात कोणत्याही प्रकारच्या आणि कोणत्याही वेळी गुणवत्तापूर्वक सुविधा सर्वसामान्य रुग्णांसाठी मिळाव्यात, खाजगी रुग्णालयांऐवजी या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढावी, यासाठी आरोग्य क्षेत्रात अजून मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
विभागाचे सचिव धीरजकुमार यांनी आपल्या मनोगतात आरोग्यविषयक कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या व लोकार्पण केलेल्या सुविधांबद्दल कौतुकास्पद काम झाल्याचे सांगून, रुग्णांच्या हक्काचे घर निर्माण होत असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या सेवाकाळात काम करण्याची इच्छा असल्याचे सांगून, पुरोगामी राजर्षी शाहू महाराजांच्या जिल्ह्यात येऊन चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आल्याचे सांगितले. त्यांनी उपस्थित वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘रुग्ण हाच खरा गुरु’ मानून चांगल्या आरोग्य सेवा देण्याचे आवाहन केले. आयुक्त अनिल भंडारी यांनी जिल्ह्यातील वाढत्या वैद्यकीय सेवांचा शिक्षण क्षेत्रासह रुग्णांसाठी मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले. डॉ. सत्यवान मोरे यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी मानले. या कार्यक्रमात सीएसआरमार्फत दिलेल्या विविध सुविधांसाठी संबंधितांचा सन्मान करण्यात आला.
शेंडा पार्कमधील वैद्यकीय आरोग्य संकुल सर्व सुविधा असलेले आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे कोल्हापुरातील पहिले शासकीय आरोग्य संकुल असेल. यात एकूण ११०० खाटांची सुविधा उभारण्यात येणार असून, त्यात ६०० खाटांचे जनरल हॉस्पिटल, २५० खाटांचे महिला रुग्णालय, २५० खाटांचे कर्करोग रुग्णालय, १०० खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकल्पातील ६०० खाटांच्या जनरल हॉस्पिटलच्या इमारतीत पहिल्या मजल्यावरील स्लॅब टाकण्याचा शुभारंभ संपन्न झाला.
*सीपीआरमध्ये अत्याधुनिक सुविधा*
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) विविध अत्याधुनिक विभागांचा शुभारंभ करण्यात आला. प्रत्येक बेडसाठी मल्टीपॅरा मॉनिटर, सेंट्रल ऑक्सिजन, सेंट्रल सक्शन तसेच व्हेंटिलेटर इत्यादी सुविधा असलेल्या ३० खाटांचे अत्याधुनिक मॉड्युलर अपघात विभाग, १५ खाटांचे अत्याधुनिक डायलिसिस सेंटर, दूधगंगा इमारतीमधील तळमजल्यावरील १५ खाटांचा अतिदक्षता विभाग, अत्याधुनिक क्ष-किरण डी. आर. सिस्टम तसेच आयुष्मान भारत डिजिटल मिशन इंटिग्रेटेड पेशंट मॅनेजमेंट सिस्टम व डिजिटल त्वचारोग ओपीडीचे लोकार्पण करण्यात आले. यात भारतातील आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत तयार झालेला पहिला फिरता दवाखाना व पॅथॉलॉजी लॅब विथ पेशंट मॅनेजमेंट सिस्टीमचा समावेश आहे. यामध्ये रेवमॅक्स टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, पल्लवी मेडिकेअर प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, अगप्पे डायग्नोस्टिक लिमिटेड मुंबई या कंपन्यांकडून सीएसआर अंतर्गत फिरता दवाखाना वाहनाचे लोकार्पण झाले.
कोल्हापूरसाठी ही एक अभिमानास्पद बाब असून, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील आरोग्यसेवेत नवा अध्याय सुरू होणार आहे. हे वैद्यकीय संकुल केवळ शासकीय दर्जाचा विस्तार नाही, तर एक आरोग्यदायी भविष्याची नांदी ठरणार आहे.