विठूनामाच्या गजरात पुईखडीतील रिंगण सोहळ्याने डोळ्यांचे फेडले पारणे
schedule06 Jul 25 person by visibility 284 categoryसामाजिक

कोल्हापूर : पायी हळूहळू चाला, मुखी विठू नाम बोला' म्हणत भक्तिगीते, अभंग आणि "माऊली माऊली' च्या जयघोषात रविवारी आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापूर ते नंदवाळ पायी दिंडी झाली. वारकऱ्यांच्या अभंग आणि टाळमृदंगाच्या गजरात आणि अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी झेलत पुईखडी येथील माऊलींचा नेत्रदीपक रिंगण सोहळा पार पडला. हजारो भाविकांच्या साक्षीनं पार पडलेल्या गोल रिंगण सोहळ्यानं डोळ्यांचं पारणं फेडलं. कोल्हापूर येथील श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा समितीन आयोजित केलेल्या प्रति पंढरपूर पायी दिंडीत अबाल वृद्धांनी सहभाग घेत विठूनामाचा गजर केला.
करवीर तालुक्यातील नंदवाळ येथील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या मंदिरात आषाढी एकादशीला दर्शनासाठी लाखो भाविक आले होते. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरापासून मान्यवरांच्या उपस्थितीत आरती आणि पूजनानंतर पालखी दिंडीचं नंदवाळकडं प्रस्थान झालं. फुलांनी सजवलेला रथ, चांदीची पालखी, त्यामध्ये पादुका, ज्ञानेश्वरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, विठूनामाचा जयघोष करत शिस्तबद्धरीत्या निघालेले हजारो भाविक, अशा भक्तिमय वातावरणात ही दिंडी मिरजकर तिकटी, निवृत्ती चौक, उभा मारूती चौक, खंडोबा तालीम इथं आली. या ठिकाणी उभं रिंगण पार पडलं. यानंतर पुन्हा दिंडी नंदवाळच्या दिशेनं मार्गस्थ झाली. जुना वाशी नाका, क्रशर चौक, सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर मार्गे ही दिंडी लवाजम्यासह पुईखडी इथं आली. पालखी मार्गावर पुरुष-महिला, तरुण-तरुणी यांनी फुगड्या घालून सोहळ्याचा आनंद लुटला.
या रस्त्यावर विविध संस्था-संघटनांच्या वतीनं भाविक भक्तांसाठी उपवासाच्या पदार्थाचं, प्रसादाचं वाटप करण्यात आलं. पुईखडी इथं आमदार राजेश क्षीरसागर, दिंडी प्रमुख आनदराव लाड महाराज, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, शारंगधर देशमुख, वकील राजेंद्र किंकर, बाळासाहेब पवार, एम. पी. पाटील, अजित चव्हाण आदींच्या हस्ते अश्व पूजन झालं. प्रथम वारकऱ्यांचं गोल रिंगण पार पडलं. त्यानंतर अश्वांनी रिंगण सोहळा पूर्ण केला. या रिंगण सोहळ्यानं उपस्थित हजारो भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. रिंगण सोहळ्यानंतर रिंगण मार्गाची माती माथी लावण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली. यानंतर नंदवाळकडं दिंडी रवाना झाली. या पायी दिंडी सोहळ्यात वारकऱ्यांसह तरुण-तरुणी आणि लहान मुलांचाही लक्षणीय सहभाग होता. अनेक मुले विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेत आपल्या पालकांचा हात धरून रिंगण सोहळ्यात सहभागी झाले होते.
बोंद्रेनगर नरसिंह कॉलनी येथील धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी केळी, खिचडी वाटप करण्यात आलं. मावळा न्यू नागदेवाडी यांच्यामार्फत आमदार अमल महाडिक यांनी भाविकांना केळीचं वाटप केलं. गेली चार वर्षे आषाढी एकादशीनिमित्त वाशी नाकाजवळ हा उपक्रम पार पडला.