अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचा आढावा
schedule22 Jan 26 person by visibility 66 categoryराज्य
कोल्हापूर : राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी बांधकाम विभागाकडील जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या बैठकीत श्री अंबाबाई विकास आराखडा, श्री जोतीबा विकास आराखडा, खिद्रापूर, सारथी इमारत, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत शेंडा पार्क अशा विविध बांधकाम सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती घेतली व आवश्यक सूचना प्रशासनास केल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक तथा आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., मुख्य अभियंता श्री. रहाणे, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, पुरातत्त्व विभागाचे विलास वाहने यांच्यासह संबंधित विभागांचे इतर अधिकारी उपस्थित होते.
शासनाकडून यापूर्वी निधी मंजूर असलेल्या व सद्यस्थितीत कामे सुरू असलेल्या कामकाजाबाबत पुरातत्त्व व बांधकाम विभागाने सादरीकरणातून माहिती दिली. यावेळी मनीषा म्हैसकर यांनी उपस्थितांना सूचना केल्या. त्या म्हणाल्या, सर्व मंजूर कामे विहित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करावीत. प्रत्येक कामांचे विविध टप्प्यांमध्ये विभागणी करून आराखडे सादर करावेत. प्राधान्यक्रम ठरवून आवश्यक कामे हाती घ्या, त्यानंतर निधी प्राप्त होईल तशी पुढील कामे मंजुरीसाठी घ्या.
मंदिर विकास आराखड्यांची अंमलबजावणी करताना भूसंपादनासह त्यांच्या पुनर्वसनाला प्राधान्य द्या. वाढलेले भाव विचारात घेऊन नागरिकांना पुनर्वसनाचे पर्याय दिल्यास त्यांनाही त्याठिकाणी अडचणी राहणार नाहीत. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी एकत्रित प्राधान्यक्रम ठरवून कामांचे क्रम निश्चित करावेत. प्रथम आवश्यक कामांना निधी खर्च करावा. कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक असून येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यांच्यासह स्थानिकांना सोयी-सुविधा उपलब्ध होतील यासाठी प्रथम विचार व्हावा. बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सुरू असलेल्या कामांची माहिती अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली. स्वागत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची प्रतिकृती व पुस्तिका देऊन करण्यात आले. बैठकीचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी केले. बैठकीनंतर त्यांनी श्री अंबाबाई व श्री जोतिबा मंदिरातील कामांची पाहणी केली. त्यासोबतच त्यांनी नव्याने सुरू झालेल्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचीही पाहणी केली.