शिवाजी विद्यापीठाचे समाजाशी विश्वासार्हतेचे नाते: डॉ. ज्योती जाधव
schedule22 Jan 26 person by visibility 71 categoryसामाजिक
🔹डॉ. शहाजीराव देशमुख यांच्याकडून सव्वातीन लाखांचा मदतनिधी
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने आपल्या विविध उपक्रमांद्वारे सातत्याने सामाजिक बांधिलकीचे आणि विश्वासार्हतेचे नाते समाजाशी जोडलेले आहे. लोकस्मृती वसतिगृह आणि भगवान महावीर अध्यासन ही त्याची उदाहरणे आहेत. या दोन्ही उपक्रमांकडे आजही समाजाच्या विविध घटकांकडून मदतीचा ओघ सुरू आहे. याची प्रचिती सातत्याने येत आहे. त्याबद्दल शिवाजी विद्यापीठ कृतज्ञ आहे, अशी भावना विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डॉ. शहाजीराव बाळासाहेब देशमुख यांनी डॉ. वत्सला शहाजीराव देशमुख यांच्या नावे लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहामध्ये निवासी कक्ष उभारण्यासाठी ३ लाख २५ हजार रुपयांचा निधी आज प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्याकडे सुपूर्द केला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी भूगोल अधिविभागाचे डॉ. संभाजी शिंदे आणि स्थापत्य विभागाचे उपकुलसचिव रणजीत यादव उपस्थित होते.
त्याचप्रमाणे भगवान महावीर अध्यासनाच्या नूतन इमारतीच्या बांधकामासाठी सौ. भारती प्रशांत उपाध्ये यांनी ५१ हजार रुपये तर श्री. चवगोंडा आप्पाणा पोमाई यांनी दहा हजार रुपयांची देणगी समन्वयक डॉ. विजय ककडे यांच्याकडे सुपूर्द केली आहे.