मंत्रालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली ध्यानातून अनुभूती; सदगुरु श्री शिवकृपानंद स्वामींचे समर्पण ध्यान योग शिबीर संपन्न
schedule18 Nov 25 person by visibility 50 categoryराज्य
मुंबई : ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्वज्ञानावर आधारित सदगुरु श्री शिवकृपानंद स्वामींच्या हिमालयीन समर्पण ध्यान योग शिबिराच्या माध्यमातून मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हिमालयातील आठशे वर्षांपूर्वीच्या ध्यानाची दिव्य अनुभूती घेतली.
मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित या अध्यात्मिक कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही ध्यानाची अनुभूती घेतली. स्वामींच्या प्रवचनाच्या माध्यमातून प्राचीन अध्यात्माची अनुभूती मिळते. तसेच या ध्यानयोग संस्काराच्या माध्यमाने तरुणांमध्ये एकाग्रता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन देशात निश्चितच उत्कृष्ट संस्कारित नागरिक घडतील, असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला.
यावेळी श्री शिवकृपानंद स्वामींच्या पत्नी गुरू मां रुचिरा मोडक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, अपर मुख्य सचिव सीमा व्यास, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.डॉ.अपूर्वा पालकर आदींसह मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सदगुरु श्री शिवकृपानंद स्वामी यांनी तब्बल 16 वर्षे हिमालयात ध्यान साधना केली आहे. ही ध्यान साधना गुरूच्या आत्म्याने शिष्याच्या आत्म्यावर केलेला एक अध्यात्मिक संस्कार असल्याचे स्वामींनी यावेळी स्पष्ट केले. जगभर योग, ध्यानधरणेत सर्व जाती-धर्माची जनता असते. ध्यानामधून सर्वांना समान अनुभूती येते. आपल्या शारिरीक समस्या सोडविण्यासाठी आत्मभाव वृद्धिंगत करा. हे सर्व चित्त, मन किती शुद्ध आणि पवित्र आहे, यावर सर्व अवलंबून आहे. समस्या ओळखून निदान करतो, तोच योग गुरु असून अध्यात्मिक प्रगतीचा मार्ग योगातून जातो. स्वतःचा चेहरा पाहण्यासाठी आरसा लागतो, तसेच अंतर्मुख होऊन अनुभूती घेतल्याशिवाय देव दिसत नाही. देव म्हणजे विश्व चेतना शक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्यातला गुरू जागृत करा, आत्म साक्षात्कार मागा. मागितल्याशिवाय मिळणार नाही. स्वतःची योग्यता सिद्ध केल्याने अध्यात्मिक प्रगती होईल. विचारांची, सफाई ध्यान धारणाने होते. ध्यान धारणेमुळे येणाऱ्या अनुभूतीबाबत श्री शिवकृपानंद यांनी अनुभव कथन केले.
गडचिरोली परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख संदीप पाटील यांनी सांगितले की, योग जगभर पोहोचला. ध्यानाशिवाय योग पूर्ण होत नाही. चित्त, वृत्ती धारणा, ध्यान हे मनाशी संबंधित असल्याने अत्यंत महत्वाचे आहेत. हिमालयीन ध्यान उच्च प्रतीचे असल्याने आपली ऊर्जा टिकविण्यासाठी ध्यान आवश्यक आहे. मेडिटेशन निर्विचार होण्याची स्थिती असते. ध्यान केल्याने एकाग्रता वाढते, ताण तणाव दूर होतो, कुठलाही आजार होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी स्वामींसोबत अर्धा तास ध्यान केले. मंत्री लोढा आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्वामी यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. मंत्र्यांचे खाजगी सचिव अजित देशमुख यांनी आभार मानले.