SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती करणारा शेतकरी महत्त्वाचा : राज्यपाल आचार्य देवव्रत; राज्यपालांच्या हस्ते नैसर्गिक शेती परिषदेचे उद्घाटनसंजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल बोर्डिंग विद्यार्थ्यांचे यश सीबीएसई प्रादेशिक विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक; दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवडशिवाजी विद्यापीठाचा ६३ वा वर्धापनदिन उत्साहात; सक्षम, विकसित राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षण हाच पर्याय: कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी नाशिक येथील आंतरराष्ट्रीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकरचा पाचवा क्रमांक हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन राज्यस्तरीय मुलींच्या खो खो स्पर्धेत मेन राजाराम अजिंक्य सुवर्णपदक पटकावलेकोरे अभियांत्रिकीच्या १६ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत निवडसैन्य भरतीसाठी संजय घोडावत फाउंडेशनचा मोफत अन्नछत्र उपक्रमनैसर्गिक शेतीस अनुरूप वाणांची निर्मिती आवश्यक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशिवाजी विद्यापीठात एनर्जी स्वराज यात्रेचे स्वागत

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाचा ६३ वा वर्धापनदिन उत्साहात; सक्षम, विकसित राष्ट्रनिर्मितीसाठी शिक्षण हाच पर्याय: कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी

schedule18 Nov 25 person by visibility 81 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : सक्षम आणि विकसित राष्ट्राच्या निर्मितीसाठी शिक्षणाला पर्याय नाही. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाने गेल्या ६३ वर्षांत केलेली वाटचाल अत्यंत दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठाच्या ६३ व्या वर्धापन दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी होते. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव प्रमुख उपस्थित होत्या.

विद्यापीठातील गुणवंत शिक्षकाचा पुरस्कार जीव-रसायनशास्त्र अधिविभागाच्या डॉ. पद्मा बाबूलाल दांडगे यांना, तर बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार जयसिंगपूरच्या श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालयातील डॉ. विकास सदाम मिणचेकर यांना प्रदान करण्यात आला.

कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी आपल्या भाषणामध्ये शिक्षणाचे मानवी जीवनातील महत्त्व अनेक उदाहरणांसह अधोरेखित केले. ते म्हणाले, उच्चशिक्षण व्यवस्थेकडून सर्वच घटकांच्या वाढत्या अपेक्षा आहेत. त्याचप्रमाणे शैक्षणिक उदासिनतेचेही वातावरण आहे. खासगी आणि परदेशी विद्यापीठांचे आव्हानही सामोरे उभे आहे. अशा पेचातून मार्ग काढण्यासाठी अतिसूक्ष्म विश्लेषणाबरोबरच संवेदनशील आणि मूल्यवान नागरिक घडविण्याची जबाबदारी आपल्याला निभावावी लागणार आहे. बुद्धिमत्ता विकसन करणारे शिक्षण, सूक्ष्म आणि सारासार विचार करणारे आणि मूल्यांची जाण असणारे विद्यार्थी घडविणारे शिक्षण तसेच विविध कौशल्ये प्रदान करणारे शिक्षण असे विद्यार्थ्यांचे चौफेर व्यक्तीमत्त्व घडविण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे या बाबींसाठी सक्षम आहे. तथापि, त्याची अंमलबजावणी तितक्याच प्रभावी आणि सक्षम पद्धतीने करण्याची जबाबदारी शिक्षक, विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकार मंडळे या सर्वच घटकांनी स्वीकारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

▪️‘शिवाजी विद्यापीठाची वाटचाल अनुकरणीय’
महाराष्ट्राचे आराध्यदैवत, राष्ट्रपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने स्थापन झालेल्या शिवाजी विद्यापीठाची गेल्या ६३ वर्षांतील वाटचाल ही अनुकरणीय स्वरुपाची असल्याचे कौतुकोद्गार कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी या प्रसंगी काढले. ते म्हणाले, अवघे पाच अधिविभाग, ३४ महाविद्यालये आणि १४ हजार विद्यार्थ्यांसह सुरवात केलेल्या शिवाजी विद्यापीठाने या वाटचालीत ३४ अधिविभाग, २९७ महाविद्यालये आणि अडीच लाख विद्यार्थी अशी संख्यात्मक वाटचाल करीत असताना पश्चिम महाराष्ट्राच्या शैक्षणिक उत्थानामध्ये मोलाची भर घातली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पातळीवरील नॅकचे A++ मानांकन आणि नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय संस्थात्मक रॅंकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) आघाडीच्या ५० अकृषी राज्य विद्यापीठांत स्थान प्राप्त करून आपली गुणवत्ताही सिद्ध केली आहे. जागतिक दर्जाचे अनेक संशोधक या विद्यापीठाने देशाला दिले आहेत. त्यांच्या संशोधनाचा दबदबा सर्वदूर आहे. प्रत्येक घटकाची समर्पणशील वृत्ती आणि निष्ठा यामुळेच हे शक्य झाले आहे, असेही ते म्हणाले.

▪️गती, दिशा आणि वेळ यांमधील समन्वयामुळेच प्रगती: कुलगुरू डॉ. गोसावी

आपल्या अध्यक्षीय भाषणात शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गेल्या वर्षभरातील वाटचालीचा थोडक्यात वेध घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कुलगुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि आता कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ यांचा प्रभारी कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी लाभली. यामुळे एकाच वेळी आयुष्यात फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या नावाशी आणि कर्मभूमीशी जोडले गेल्याचा अतिशय आनंद आणि अभिमान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने आपल्या वाटचालीत सातत्यपूर्ण गती राखली, ही गती योग्य वेळेत योग्य दिशेने ठेवली. या तिन्हीच्या समन्वयातून शिवाजी विद्यापीठाने आपली सर्वंकष प्रगती साधली आहे. विद्यापीठाच्या लौकिकाला पुढे घेऊन जातील, असे अनेकविध उपक्रम यशस्वीपणे राबवित आहोत. भविष्यातही नव्या युगाची आव्हाने लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना ती पेलण्यास सक्षम करण्याचे उद्दिष्ट बाळगून वाटचाल सुरू आहे. भविष्य हे ज्ञान, कौशल्य, संशोधन आणि मूल्याधारित शिक्षणावर उभे आहे. शिवाजी विद्यापीठ केवळ पदवीधर नव्हे, तर विचारवंत, उद्योजक, समाजसेवक आणि राष्ट्रनिर्माते घडविण्यास कटिबद्ध आहे. “विकसित भारत@२०४७” या स्वप्नपूर्तीत आपला प्रत्येक विद्यार्थी सक्रिय योगदान देण्यासाठी सिद्ध असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या वेळी विद्यापीठातील, महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा विद्यापीठ प्रशासकीय तसेच कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच, प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

▪️जैवतंत्रज्ञान, अर्थशास्त्र अधिविभाग ठरले उत्कृष्ट
शिवाजी विद्यापीठाने सन २०१९ पासून उत्कृष्ट अधिविभाग पुरस्कार देण्यास सुरवात केली. विज्ञान व तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रे असे दोन गट करून अधिविभागांचे सर्वंकष काटेकोर मूल्यमापन करण्यात येऊन हा पुरस्कार देण्यात येतो. संबंधित विभागाला पारितोषिकापोटी दहा लाख रुपये, प्रमाणपत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा प्रदान करण्यात येतो. यंदा उत्कृष्ट अधिविभागांसाठीचा पुरस्कार जैवतंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र अधिविभाग यांना देण्यात आला.

▪️‘नॅक’ मानांकित महाविद्यालयांचा गौरव
'नॅक'चे ‘A++’, ‘A+’ आणि ‘A’ मानांकन मिळविणाऱ्या संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा समारंभात सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय (कला, वाणिज्य व विज्ञान), रामानंदनगर (जि. सांगली), मुधोजी महाविद्यालय, फलटण (जि. सातारा), श्रीमती कस्तुरबाई वालचंद कला आणि विज्ञान महाविद्यालय (सांगली) आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पलूस (जि. सांगली) या महाविद्यालयांचा समावेश आहे.

▪️वर्धापन दिन समारंभात प्रदान करण्यात आलेल्या विविध पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:

विद्यापीठातील गुणवंत शिक्षक: डॉ. पद्मा बाबुलाल दांडगे, जीव-रसायनशास्त्र अधिविभाग

विद्यापीठातील गुणवंत प्रशासकीय सेवक:

१. विजय रामचंद्र पोवार, अधीक्षक, कॅशबुक विभाग

२. विनय संभाजीराव पाटील, सहायक अधीक्षक, आस्थापना, पी.जी. विभाग

३. कल्लाप्पा दत्तू पोटले, हवालदार, मा. कुलगुरू कार्यालय

४. राजेंद्र लक्ष्मण बारड, प्रयोगशाळा परिचर, जीव-रसायनशास्त्र अधिवभाग

संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत प्राचार्य:

१. डॉ. विठ्ठल सुबराव शिवणकर, बळवंत महाविद्यालय, विटा, जि. सांगली

संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक:

१.      डॉ. जयवंत शंकरराव इंगळे, प्रा.डॉ. एन.डी. पाटील महाविद्यालय, मलकापूर, जि. कोल्हापूर

महाविद्यालयीन गुणवंत सेवक:

१.      प्रकाश मारुती कांबळे, मुख्य लिपिक, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज

२.      दिलीप अशोक सुवारे, प्रयोगशाळा परिचर, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील महाविद्यालय, तासगाव, जि. सांगली

कै. बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार: डॉ. विकास सदाम मिणचेकर, श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर

यावेळी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी पसायदान सादर केले. धैर्यशील यादव, नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

तत्पूर्वी, विद्यापीठाच्या प्रांगणात प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, प्रभारी अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, डॉ. राजाराम गुरव, डॉ. वर्षा मैंदर्गी, डॉ. अजय साळी, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, आयक्यूएसी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर, राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन सदस्य सिद्धार्थ शिंदे यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांचे कुटुंबिय, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes