कोल्हापूर : गुंठेवारी विकास अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर अखेर
schedule18 Nov 25 person by visibility 82 categoryमहानगरपालिका
▪️नागरिकांनी मुदतीत अर्ज दाखल करण्याचे प्रशासक के मंजूलक्ष्मी यांचे आवाहन
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधिन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम दि.12 मार्च 2021 अन्वये 31 डिसेंबर 2020 पूर्वी गुंठेवारी पद्धतीने झालेल्या अनधिकृत बांधकामांना नियमित करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
पूर्वी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 24 सप्टेंबर 2023 होती. मात्र काही संघटना व नागरिक यांनी मुदतवाढ मागितल्याने महानगरपालिकेने शासनाशी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार महाराष्ट्र शासनाचे दि. 16 जून 2025 रोजी मार्गदर्शन प्राप्त झाले असून मा.उच्च न्यायालयातील विधिज्ञांचा अभिप्राय घेतल्यानंतर प्रशासकीय दप्तरी ठराव क्र. 676 दि.14 ऑगस्ट 2025 अन्वये अर्ज दाखल करण्याचा कालावधी जाहीर प्रकटन झाल्यापासून 90 दिवस इतका वाढविण्यात आलेला आहे.
महानगरपालिकेने जाहीरपणे सूचित केले आहे की अर्ज दाखल करण्याची शेवट तारीख 21 नोव्हेंबर 2025 आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी प्रकरणे वेळेत नगररचना कार्यालयात दाखल करावीत, असे आवाहन प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.