सैन्य भरतीसाठी संजय घोडावत फाउंडेशनचा मोफत अन्नछत्र उपक्रम
schedule17 Nov 25 person by visibility 77 categoryसामाजिक
कोल्हापूर : कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात होणाऱ्या आगामी सैन्य भरती मोहिमेत देशभरातून सहभाग घेणाऱ्या युवकांसाठी व्हाईट आर्मीतर्फे आयोजित मोफत अन्नछत्राचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय संजय घोडावत फाउंडेशनने जाहीर केला आहे. देशसेवेसाठी धडपडणाऱ्या तरुणांना अन्नासारख्या मूलभूत गरजा विनामूल्य उपलब्ध करून देणे ही सामाजिक बांधिलकीच असल्याचे फाउंडेशनने सांगितले.भरती साठी येणाऱ्या २० हजार पेक्षा जास्त सहभागी उमेदवारांना याचा लाभ होणार आहे.
संजय घोडावत विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात चेअरमन संजय घोडावत यांनी व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांना अन्नछत्रासाठीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी विश्वस्त विनायक भोसले, संचालक डॉ. विराट गिरी आदी मान्यवर उपस्थित होते. भरती प्रक्रियेदरम्यान हजारो युवक दिवसभर प्रतिक्षेत असल्याने त्यांच्या जेवणाची समस्या टाळण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.
यावेळी संजय घोडावत फाउंडेशनचे अध्यक्ष संजय घोडावत म्हणाले, “देशाचे रक्षण करणाऱ्या भावी जवानांसाठी मदत करण्याची संधी आम्ही आमचे भाग्य समजतो. कारण या सर्व सैनिकांमुळे आपण आणि आपला देश सुरक्षित आहे. व्हाईट आर्मीच्या लोकहिताच्या कामाला संजय घोडावत फाउंडेशन भविष्यातही सहकार्य देत राहील.”
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत, शैक्षणिक व आरोग्य उपक्रम, पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना मदत, कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत करोना काळातील गरजूंना आवश्यक ती मदत अशा अनेक सामाजिक कार्यांची परंपरा फाउंडेशनने आधीपासूनच जपली आहे. व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांनी या मोलाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत सांगितले की, “या पाठिंब्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या शेकडो युवकांना पोषक अन्नाची सुविधा उपलब्ध होऊ शकली.”