अणुऊर्जा विभागातील रोजगार संधींबाबत सोमवारी वरिष्ठ शास्त्रज्ञांचा विद्यार्थ्यांशी संवाद
schedule08 Jan 26 person by visibility 158 categoryशैक्षणिक
कोल्हापूर: भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग (डीएई) मधील करिअरच्या संधी आणि भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) द्वारे होणाऱ्या भरती प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी 'डीएई आउटरीच प्रोग्राम-२०२६' चे आयोजन शिवाजी विद्यापीठात भौतिकशास्त्र अधिविभाग आणि अणुऊर्जा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने केले आहे. १२ जानेवारीला विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होईल. यामध्ये बीएआरसीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि अभियंते उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. विशेषतः विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
देशातील अणुऊर्जा क्षेत्रातील विविध राष्ट्रनिर्माण उपक्रमांना गती देण्यासाठी, भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) प्रशिक्षण शाळेमार्फत दरवर्षी अणुऊर्जा विभाग (डीएई) वैज्ञानिक अधिकार्यांची भरती करत असते. या OCES (Orientation Course for Engineering Graduates and Science Postgraduates) कार्यक्रमांतर्गत दरवर्षी सुमारे १५० अभियांत्रिकी पदवीधर आणि ७५ विज्ञान पदव्युत्तर विद्यार्थ्यांना निवडले जाते. या कार्यक्रमाद्वारे अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना, विशेषतः अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना, डीएई मधील संशोधन-विकासाच्या आघाडीच्या क्षेत्रांविषयी माहिती देणे आणि त्यामधील करिअरच्या संधींबद्दल मार्गदर्शन करणे हे उद्दिष्ट आहे.
संशोधन, नवनिर्मिती आणि राष्ट्र उभारणीत रस असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे सत्र अत्यंत लाभदायक ठरणार आहे. बी.ए.आर.सी. व्यतिरिक्त, डीएईच्या अंतर्गत येणाऱ्या इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च, राजा रामण्णा सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर, ॲटॉमिक मिनरल्स डायरेक्टरेट, आणि जागतिक अणुऊर्जा भागीदारी केंद्र तसेच डीएईच्या इतर संस्थांमध्ये करिअर कसे करावे, याचे मार्गदर्शन मिळेल. अणुविज्ञान, अणुऊर्जा व संबंधित तंत्रज्ञान क्षेत्रात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाइटवर पूर्वनोंदणी करावी, असे आवाहन संयोजकानी केले आहे. अधिक माहितीसाठी समन्वयक डॉ. व्ही. एस. कुंभार (७२०८५१३९४७), डॉ. आर. एस. व्हटकर (७५८८२४६१७०) यांच्याशी संपर्क साधावा.

