महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची रचनात्मक दृष्टी आणि कार्य प्रेरणादायी: डॉ. सुशील धसकटे
schedule08 Jan 26 person by visibility 149 categoryशैक्षणिक
कोल्हापूर: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सामाजिक परिवर्तनाची मांडणी केवळ संघर्षापुरती मर्यादित न ठेवता रचनात्मक दृष्टी आणि रचनात्मक कार्य उभारणीतून केली. शिक्षण, सामाजिक समता आणि बहिष्कृत समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पुण्याचे प्रसिद्ध लेखक-प्रकाशक डॉ. सुशील धसकटे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनातर्फे शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते, तर माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. प्रकाश पवार प्रमुख उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याचे पैलू’ या प्रा. गो.मा. पवार लिखित-संपादित पुस्तकाचे डॉ. साळुंखे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
महर्षी शिंदे यांच्या विचारकार्याचा वेध घेताना डॉ. धसकटे म्हणाले, शिंदे लोकांच्या प्रश्नांकडे सहानुभूतीने पाहात. त्यांनी जातिव्यवस्थेतील अन्यायाला विवेकशील आणि मानवतावादी दृष्टिकोनातून आव्हान दिले. संस्थात्मक बांधणी आणि समाजघडणीचा स्पष्ट आराखडा त्यांच्या कार्यात दिसून येतो. संस्थात्मक कार्याचे महत्त्व ओळखल्यामुळेच महर्षी रचनात्मक कार्याची उभारणी करू शकले. विविध प्रकारच्या नोंदी वेळोवेळी ठेवण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे आजघडीला भारताच्या सामाजिक इतिहासाचा मोठा दस्तावेज निर्माण झाला आहे. त्यांचा हाच वारसा प्रा. गो.मा. पवार यांनीही पुढे जोपासला. त्याचे प्रतिबिंब प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकामध्येही पाहावयास मिळते.
यावेळी डॉ. प्रकाश पवार यांनी पुस्तकाविषयी भाष्य केले. आपल्या भाषणात महर्षी शिंदे यांच्याकडे पाहण्याचा गो.मा. पवार यांचा आधुनिकतावादी दृष्टीकोन मांडला. ते म्हणाले, शिंदे यांनी ‘बहिष्कृत भारत’ ही संकल्पना मांडून भारताचा दुर्लक्षित आणि वंचित चेहरा जगासमोर आणला. वंचित समाजाचा प्रश्न हा केवळ नैतिकतेचा नसून मानवी हक्कांचा आणि सामाजिक न्यायाचा मुद्दा असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले होते. महर्षी शिंदे यांच्या विचारांना समकालीन संदर्भ देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य गो.मा. पवार यांनी केले, याकडे डॉ. प्रकाश पवार यांनी लक्ष वेधले. उत्तर-आधुनिक कालखंडात शिंदे यांच्याविषयी लिहीत असताना आधुनिकतावादी कालखंडाच्या परिप्रेक्ष्यातून त्यांची मांडणी करण्याचे कार्य पवार यांनी केले. भारतीय आधुनिकतेच्या ऱ्हासपर्वाच्या काळात लिहीण्याचे धाडस गो.मा. पवार यांनी केले. त्यामुळे शिंदे यांचे कार्य आजच्या काळाशी जोडले गेले.
डॉ. माणिकराव साळुंखे यांनी आपल्या भाषणात महर्षी शिंदे यांचे कार्य समजून घेताना संघर्ष आणि रचनात्मक कार्य यांचा समतोल महत्त्वाचा असल्याचे सांगितले. त्याचबरोबर डॉ. गो.मा. पवार यांच्यासमवेतच्या स्नेहबंधालाही उजाळा दिला. ते म्हणाले, समाजातील विषमता, अस्वस्थता आणि बहिष्कार समजून घेण्यासाठी शिंदे यांचे विचार अधिकच उपयुक्त ठरतात. गो.मा. पवार यांच्या लेखनामुळे शिंदे यांचा आधुनिक, चिकित्सक आणि परिवर्तनवादी पैलू नव्या पिढीपर्यंत पोहोचल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, अस्पृश्यता निवारण, मुरळी प्रथा प्रतिबंध तसेच शेतकरी मेळावे इत्यादींच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांसाठी महर्षी शिंदे यांनी तळमळीने काम केले. जे जे काम त्यांनी हाती घेतले, ते अत्यंत मनापासून केले. शिंदे यांचे कार्य आणि त्या कार्याच्या स्मृती समाजापर्यंत पोहोचवत राहणे ही सजग नागरिकांची जबाबदारी आहे.
कार्यक्रमात राष्ट्रपती पदक विजेता विद्यार्थी अक्षय जहागीरदार आणि गुणवंत विद्यार्थिनी अनुराधा गुरव यांचा डॉ. साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुरवातीला ज्येष्ठ पर्यावरणवादी माधव गाडगीळ आणि हिंदी साहित्यिक ज्ञानरंजन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यक्रमास राहुल पवार, डॉ. प्रभंजन माने, डॉ. संदीप भुयेकर (वाराणसी), डॉ. भारतभूषण माळी, डॉ. दीपक भादले, डॉ. युवराज देवाळे, दत्ता जाधव यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

