वाहतूक पोलिसांची चाणाक्ष कारवाई! — १४ वर्षीय हरवलेला विद्यार्थी सुखरूप सापडला
schedule03 Nov 25 person by visibility 66 categoryसामाजिक
        ▪️तावडे हॉटेल परिसरात मुलाचा शोध; वाहतूक पोलीस व होमगार्डच्या तत्परतेने पालकांचा दिलासा
कोल्हापूर : शहरात एका १४ वर्षीय विद्यार्थ्याच्या अचानक बेपत्ता होण्याने खळबळ उडाली होती. मात्र, कोल्हापूर वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या सतर्कतेने व होमगार्डच्या चाणाक्ष कारवाईमुळे हा मुलगा केवळ काही तासांतच सुखरूप सापडला.
आयुष धर्मरत्न सोनवले (वय १४) असे या मुलाचे नाव असून तो छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन, पेठ वडगाव येथे शिक्षण घेत होता. वस्तीगृहात राहणारा आयुष शाळेच्या युनिफॉर्ममध्ये अचानक बाहेर पडल्याने शाळा प्रशासन आणि पालकांची चिंता वाढली.
शाळेतील शिक्षकांनी फोनद्वारे पालकांना मुलगा वस्तीगृहातून बाहेर गेल्याची माहिती दिली. तत्काळ वडील घटनास्थळी दाखल झाले आणि होमगार्ड अधिकारी जमादार कांबळे यांच्याकडे मुलाचा फोटो व संपर्क क्रमांक (९०४९४५२३३०) सोपवला. त्यानंतर वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार नंदकिशोर नवनाथ कुंभार यांनी शोध मोहीम सुरु केली.
या दोघांच्या चोख शोधमोहिमेच्या प्रयत्नातून अखेर मुलगा तावडे हॉटेल परिसरात सुखरूप अवस्थेत सापडला. लगेचच आयुषला त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेमुळे पालकांनी दिलासा व्यक्त करत वाहतूक पोलिस व होमगार्डच्या कार्याचे कौतुक केले. नागरिकांकडूनही “वाहतूक पोलिसांची सतर्कता म्हणजे जनतेचा आधार!” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
कोल्हापूर वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेने एका हरवलेल्या मुलाचे प्राण वाचवण्यासारखे कार्य घडले असून, या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.