पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायद्यावर राज्यस्तरीय प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम
schedule08 Jan 26 person by visibility 190 categoryराज्य
कोल्हापूर : पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा (PPV&FRA) याबाबत शेतकरी, संशोधक व विस्तार यंत्रणेमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने एक दिवसीय प्रशिक्षण, जनजागृती कार्यक्रम व प्रदर्शनाचे आयोजन ८ जानेवारी २०२६ रोजी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथे करण्यात आले.
हा कार्यक्रम भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, कणेरी, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरण (PPV&FRA), नवी दिल्ली आणि कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे. कोल्हापूर, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील कृषी विज्ञान केंद्रे सहआयोजक म्हणून सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रविंद्र सिंह, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, कणेरी यांनी केले. त्यांनी पीक वाण संरक्षण कायद्याचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने असलेले महत्त्व, स्थानिक वाणांचे संवर्धन आणि बौद्धिक संपदा हक्क यावर सविस्तर मागदर्शन केले.
डॉ. विजय शेलार, सहयोगी संचालक (संशोधन), महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी पीक वाण नोंदणी प्रक्रिया, शेतकरी व संशोधकांचे हक्क व जबाबदाऱ्या याविषयी सखोल मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी आपल्या पारंपरिक वाणांची नोंदणी करून कायदेशीर संरक्षण कसे मिळवावे याबाबत त्यांनी माहिती दिली.
संजय पाटील, प्रमुख प्रकल्प अधिकारी, बायफ विकास संशोधन फाउंडेशन, पुणे यांनी जैवविविधता संवर्धन, स्थानिक बियाण्यांचे महत्त्व आणि शाश्वत शेतीमध्ये शेतकऱ्यांची भूमिका यावर व्याख्यान दिले. नैसर्गिक व पारंपरिक शेती पद्धतींचा PPV&FRA कायद्याशी असलेला संबंध त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केला.
डॉ. नरेंद्र काशीद, प्रमुख शास्त्रज्ञ (पाणी व्यवस्थापन प्रकल्प), म. फु. कृ. वि., राहुरी यांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले. जलसंधारण, सूक्ष्म सिंचन व पिकनिहाय पाणी नियोजन यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न कसे वाढू शकते, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर डॉ. ए. पी. कर्जुले, सहाय्यक प्रजनन संशोधन अधिकारी, म. फु. कृ. वि., राहुरी यांनी पीक सुधारणा, वाण निर्मिती प्रक्रिया आणि शेतकरी व संशोधक यांच्यातील सहकार्याचे महत्त्व विशद केले. वाण नोंदणीमुळे संशोधकांबरोबरच शेतकऱ्यांनाही कसा लाभ होतो, यावर त्यांनी भर दिला.
कार्यक्रमात शेतकऱ्यांनी आपल्या शंका मांडल्या व तज्ज्ञांनी त्यांचे निरसन केले. यानंतर पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायद्यांतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी कृषी विषयक आमंत्रित व्याख्यान व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना PPV&FRA कायद्याबाबत सखोल माहिती मिळून स्थानिक वाणांचे संरक्षण, शाश्वत शेती व शेतकरी सशक्तीकरणास मोठी चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात डॉ. मनोज तलाठी, प्रमुख, केविके रायगड, डॉ. आनंद हणमंते, प्रमुख, केविके रत्नागिरी, डॉ. बाळकृष्ण गावडे, प्रमुख, केविके सिंधुदुर्ग, डॉ. सुधीर सूर्यगंध, केविके तळसंदे व श्री अशोक भोयर, केविके पालघर व त्यांचे शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री पांडुरंग काळे व श्री राजेंद्र वावरे यांनी आभार मानले. कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

