पर्यटकांची गैरसोय टाळा; गॅस टंचाईवरून कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
schedule17 Mar 26 person by visibility 267 categoryसामाजिक
🔸कोल्हापुरातील अन्नछत्रांना अखंडित गॅस पुरवठा करण्याची मागणी
कोल्हापूर : करवीरनगरीतील भाविक, पर्यटक आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सेवाभावी वृत्तीने चालवल्या जाणाऱ्या अन्नछत्रांना व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे अडचण निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन, कोल्हापुरातील सामाजिक संस्था आणि अन्नछत्रांचा गॅस पुरवठा 'अत्यावश्यक सेवा' म्हणून अखंडित ठेवावा, अशी मागणी सकल हिंदू समाज, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोल्हापूर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असून येथे अंबाबाई दर्शन, जोतिबा डोंगर आणि पन्हाळा यांसारख्या धार्मिक व ऐतिहासिक स्थळांवर दररोज लाखो पर्यटक भेटी देतात. या पर्यटकांसह, सीपीआर रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक आणि गरजू लोकांसाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट, श्री अंबाबाई भक्त मंडळ मोफत अन्नछत्र, कोल्हापुरी थाळी आणि उत्तरेश्वर थाळी यांसारख्या संस्था नाममात्र दरात किंवा मोफत भोजन सेवा पुरवतात.
कमर्शियल गॅसच्या टंचाईमुळे हॉटेलिंग व्यवसायासोबतच अन्नछत्रांच्या सेवेत अडथळे येत आहेत. शासनाने आश्रमशाळा आणि रुग्णालयांना जसा अखंडित गॅस पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत, त्याच धर्तीवर कोल्हापूरसाठी 'खास बाब' म्हणून ही परवानगी मिळावी.
उन्हाळी सुट्टीत वाढणारी गर्दी लक्षात घेता हा पुरवठा तातडीने सुरळीत करावा.
यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. मोहिनी चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावर, शासन स्तरावर याचा पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
या निवेदनावर समन्वयक किशोर घाटगे, निरंजन शिंदे, योगेश मांजरेकर, दौलत घाटगे, मनोहर सोरप, राजेंद्र चोरगे, विशाल शिराळकर, संजय साळोखे (अध्यक्ष अंबाबाई भक्त मंडळ), ॲड. तन्मय मेवेकर, फिरोजखान उस्ताद, योगेश केरकर, अशोक गुरव, शिवानंद स्वामी, रश्मी साळोखे आणि इतर कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.