+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापूर शहरामध्ये आज 609 नागरीकांचे स्थलांतर adjustपुरग्रस्त भागात आवश्यकता पडल्यास जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ; आवश्यक ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन adjustनिवारा केंद्रामध्ये नागरीकांना चांगल्‍या सुविधा द्या - प्रशासक के.मंजूलक्ष्मी adjustकाळम्मावाडी योजनेद्वारे आज शनिवारी दुपारपर्यंत कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न सुरु adjustकोल्हापूर जिल्ह्यातील 95 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणातून 7 हजार 212 क्युसेक विसर्ग; राधानगरी धरणाचे स्वयंचलित 5 दरवाजे खुले adjustअतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 10 राज्यमार्ग व 48 प्रमुख जिल्हा मार्ग बंद adjustकोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीत लोकांना सर्वतोपरी मदत करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना adjustबेलापूर इमारत दुर्घटनेतील आपदग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत तातडीने उपलब्ध करावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवी मुंबई मनपा आयुक्तांना सूचना adjustबापट कॅम्पमधील मूर्तिकारांना मार्केट यार्डात निवारा शेड उपलब्ध करा : सतेज पाटील यांच्या सूचना; पूरग्रस्त भागाची केली पाहणी adjustकाँग्रेसच्या समन्वय समितीत आमदार सतेज पाटील
1000867055
1000866789
schedule09 Feb 23 person by visibility 1416 categoryसंपादकीय
 संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे आणि या निमित्ताने कृषी अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. हे अतिशय कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे. तसं पाहायला गेलं तर पौष्टिक तृणधान्य पिकवणारा जगातील सर्वात मोठा देश हा आपला भारत आहे. आजकालची तरुण पिढी आरोग्याच्या दृष्टीने खाणे व राहणे यावर आता लक्ष केंद्रित करताना दिसत आहे ही एक जमेची बाजू आहे.

         बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यावर मात करण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही आता काळाची गरज बनली आहे. राजगिरा, राळा, वरई, नाचणी, बाजरी, ज्वारी यासारखे पौष्टिक तृणधान्ये ही कार्बोदके, प्रथिने, जीवनसत्व आणि खनिजांनी समृद्ध आहेत.

 तृणधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तंतुमय पदार्थ असल्यामुळे याला सुपरफूड म्हणायला हरकत नाही. आपल्या महाराष्ट्रातील जनतेचे आरोग्य सुधारण्यासाठी, या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने खूप मदत होईल.
 
🟠 वरई, बाजरी, नाचणी, ज्वारी... तृणधान्य आहेत पौष्टिकतेत भारी...
सर्वप्रथम आपण तृणधान्य म्हणजे काय ते पाहूया. शेतामध्ये पिकाची वाढ होत असताना निर्माण झालेले बियाणे म्हणजेच तृणधान्य होय. जसे की नाचणी, गहू, ज्वारी, मका, तांदूळ होय. तृणधान्यामध्ये तीन घटकांचा समावेश असतो. इंडॉस्पर्म म्हणजे धान्याचा गाभा, दुसरा म्हणजे अंकुर आणि तिसरा म्हणजे बाहेरचे टरफल किंवा कोंडा. या तीन प्रकारच्या आवरणामुळे सूर्यप्रकाश, पाणी, रासायनिक खते आणि विविध रोगांपासून तृणधान्याचे संरक्षण होते.
 
🟠 तृणधान्यांचे आहारातील महत्त्व...
          मुलत: तृणधान्ये ही ऊर्जा देणारी सर्वोत्तम स्त्रोत आहेत. सध्या बाजारामध्ये ओट्स ना विशेष मागणी आहे आणि आता लोकांना कळायला लागले आहे की तृणधान्य इतकी पोषक तत्वे दुसऱ्या इतर अन्न घटकांमध्ये नाहीत. त्यामुळे तृणधान्य युक्त आहार घेण्याकडे लोकांचा कल वाढलेला दिसून येत आहे.

तृणधान्य मधून प्रथिने, खनिजे, तंतुमय घटक, कार्बोदके, आवश्यक अमिनो आम्ल मुबलक असल्याने याचा दैनंदिन आहारात याचा उपयोग होणे गरजेचे आहे. तृणधान्य पोषक आहेत, कमी खर्चिक असून आणि खाण्यास उत्तम मानले जातात.

तृणधान्याच्या नियमित सेवनाने मोठ्या आतड्याचा कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा  होण्याचा धोका कमी असतो आणि शरीराचे आयुर्मानही वाढते. तृणधान्ये हृदयविकारावर उपयुक्त ठरणारे आहेत. कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स या दोघांचेही शरीरामध्ये शोषण टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच रक्तदाबही नियंत्रणात राहतो. दिवसभराच्या आहारामध्ये दोन ते तीन वेळा तृणधान्याचे सेवन करणाऱ्या महिलांना हृदयविकार होण्याची शक्यता सुमारे 25 ते 30 टक्क्यांनी कमी होते. शिवाय शेतकऱ्यांसाठी फायद्याचे म्हणजे ही पिके कमी पाण्यामध्ये येतात आणि वातावरणात होणारा बदल सहन करतात. या पिकांमुळे जमिनीची हानी होत नाही. पर्यायाने प्रदूषण होत नाही. शिवाय ही पिके बनवण्यासाठी कमीत कमी साधनांची आवश्यकता असते. तसेच इतर पिकांच्या तुलनेने या पिकांबाबत कीड, रोग समस्या फारशा नाहीत. कमी जागेत, छोट्या क्षेत्रातही पिके उत्तम पद्धतीने येतात.

  तृणधान्यांमध्ये नाचणी, बार्ली ब्राउस राईस, राय, ज्वारी, बाजरी गहू, मका हे आवर्जून खावेत. कारण तृणधान्यामुळे भूक नियंत्रित ठेवली जाते. तृणधान्य घेतल्याने पोट बराच वेळ भरलेले असल्याने वारंवार खाण्याची गरज भासत नाही किंवा भूक लागत नाही. तृणधान्याचे सेवन करणाऱ्यांना वजन नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. परंतु याचा अर्थ असा नाही की याच्या सेवनाने वजन कमी होते. तृणधान्य खाल्ल्याने विशेषत: शरीराच्या मध्य भागात लठ्ठपणा येत नाही. त्यामुळे शरीरामध्ये चरबीचे समप्रमाणात संतुलन राहते आणि आपले शरीर प्रमाणबद्ध आणि साचेबंद तयार होण्यास मदत होते. म्हणजे पोट, नितंब आणि मांड्या यावरील चरबी वाढण्याचे प्रमाण कमी राहते आणि आपले पोट कव्हरेज क्षेत्राच्या आत राहते.

  नाचणीचे आंबील, नाचणीचे पापड, नाचणीचे लाडू, वरईचा भात तसेच राजगिरा लाडू असे तृणधान्यांपासून बनवलेले पदार्थ हे आरोग्यास अतिशय उपयुक्त आहेत. राजगिरा लाडूमध्ये पोषणमूल्ये भरपूर प्रमाणात असतात. प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहे. यामध्ये कॅल्शियम, लोह, पोटॅशियम मुबलक आढळते. स्नायूंना सुदृढ बनवते. आरोग्यास उपयुक्त आहे.

  परीक्षेला जाण्यापूर्वी जर जड अन्न खाल्ले तर सुस्ती येते. सर्व रक्त त्या जड पदार्थांचे पचन व्हावे याकडे वळतो. मेंदू व्यवस्थित काम करत नाही. त्यापेक्षा परीक्षेला जाण्यापूर्वी जर तृणधान्य युक्त आहार घेतला तर पोटाला जडपणा जाणवणार नाही. परीक्षेमध्ये जे आपण लिहिणार आहोत ते आठवण्यासाठी, आपल्या मेंदूला सुस्ती न येता मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा होईल आणि आपण उत्साहाने परीक्षा देऊ शकू.

 नाचणी किंवा रागी हे अशक्त असलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर तृणधान्य आहे. या तृणधान्यामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड मोठ्या आतड्यातील चांगल्या जिवाणूंच्या वाढीसाठी मदत करते. या जिवाणूमुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते. शरीराच्या पोषणाचे शोषण अधिक चांगल्या रीतीने होते आणि रोगप्रतिकारक शक्ती ही वाढते.

  नाचणी हे शक्तीवर्धक, पित्तशामक आहे. नाचणी रक्त शुद्ध करण्यास उपयुक्त आहे. कॅल्शियम आणि लोह मुबलक असल्याने गरोदर माता व वयोवृद्ध व्यक्तींना हाडांसाठी व ऍनिमियावर नाचणीचे पदार्थ उपयोगी ठरतात. नाचणी लठ्ठपणा कमी करण्यास उपयोगी ठरते. मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी आहे. यकृतातील चरबी कमी करण्यासही मदत होते. त्यामुळे फॅटी लिव्हर असणाऱ्या व्यक्तींनी नाचणीचा आहार आवर्जून घ्यावा.

  नाचणी हे तृणधान्य पचायला हलके असते. त्यामुळे आजारी माणसाचा अशक्तपणा दूर करण्यासाठी नाचणीची पेज उत्तम आहार आहे. तसेच अजीर्ण होणं, पोटात गॅस धरणं, पोटदुखी, आमांश, अपचन या तक्रारी नाचणी खाल्ल्यानं दूर होतात. नाचणी पोटाला त्रास न देता जीवन रक्षणापुरतेच पिष्टमय पदार्थ शरीराला पुरवते.

    नाचणीला कधी कीड लागत नाही. त्यामुळं ती वर्षभर आरामात साठवून ठेवता येऊ शकते. अनेकवेळा डॉक्टर लहान मुलांना नाचणी सत्व देण्यास सांगतात. नाचणी ही पित्तनाशक, थंड, तृप्तीकारक व रक्तातील तीक्ष्ण, उष्ण दोष कमी करते. कंबर खूप दुखत असेल तर नाचणीची पेज घ्यावी. नाचणीचा विशेष उपयोग आमांश, अजीर्ण, उदरवात, जुनाट ताप या पुन्हा पुन्हा त्रास देणाऱ्या रोगात होतो.

 नाचणीमुळं शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होते. गोवर आणि कांजिण्या तसेच नागीण विकारात पथ्यकर म्हणून नाचणीच्या पिठाची भाकरी खावी. लवकर ताकद भरून येते. फोड फोडण्यासाठी नाचणीच्या पिठाचे पोटीस बांधावे. जर केस गळत असतील तर नाचणीच्या तुसाच्या राखेचा उपयोग करावा. या राखेनं केस धुवावेत. नाचणी सत्व तुपावर भाजून त्यात गुळ, दूध आणि वेलची पावडर घातल्यास नाचणीचे सत्व तयार होते. हे पीठ हल्ली बाजारात सहज मिळते. लहान मुले, वयस्कर व्यक्ती आणि महिलांनी हे सत्व आवर्जून खावे. नाचणीच्या भाकरीचा दैनंदिन आहारात समावेश करावा. नाचणीचे लाडू, नाचणीचे धिरडी, पापड यांचाही आहारामध्ये समावेश करावा. नाचणीचा लाडू खाऊन वरून दूध पिल्यास ते पौष्टिक आणि पोटभरीचे होऊ शकते. घाईच्या वेळी महिलांना हा एक उत्तम पौष्टिक आहार आहे. पोटात गॅस धरणे, पोटदुखी, अपचन या तक्रारींवर नाचणी उपयुक्त ठरते. नाचणी मुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. मधुमेही व्यक्तींनी रोज नाचणीची भाकरी खाल्ल्यास रक्तातील ग्लुकोजवर नियंत्रण राहण्यास मदत होते. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल ही नाचणीमुळे नियंत्रणात राहण्यास मदत होते. नाचणी पचायला हलकी असल्यामुळे अगदी आजारी व्यक्तीला ही नाचणीची खीर, नाचणीचे धिरडे दिले तरी खाऊ शकतात.
 
🟠 वरई 
वरई हे नवजात शिशु , बालक आणि माता यांच्यासाठी उत्तम पोषक तृणधान्य आहे. सुदृढ आरोग्य व रोग प्रतिकार क्षमता वाढविण्यास वरई उपयुक्त आहे. मधुमेह, हृदयरोग यासारख्या रोगांचा धोका कमी करते. वरई मध्ये सोडियम कमी असते त्यामुळे शरीराचे ब्लड सर्क्युलेशन नॉर्मल ठेवण्यास मदत होते. पण थायरॉईड असणाऱ्यांनी वरई खाणे टाळावे.

  वरई मध्ये प्रोटीन मुबलक असल्याने शरीर हलके व एनर्जेटीक राहते. वरईमध्ये  अँटिऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे त्वचा, केस यांचे आरोग्य राखण्यास मदत होते. विटामिन ड3 ची कमतरता असल्यास त्वचा खरखरीत होऊन खवले पडू लागतात. आणि वरईमध्ये विटामिन ए3 भरपुर असते. त्यामुळे या रूग्णांना वरई अवश्य द्यावी. वरईत कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांची वाढ व आरोग्य राखण्यासाठी ऊपयुक्त ठरते. त्यामुळे लहान मुलांना तसेच वृद्धांना वरई ऊपयुक्त ठरते. वरईतील काही घटक हे हृदयरोगाचे प्रमाण घटवतात. पेशींच्या वाढीसाठी आवश्यक फॉस्फरस व मॅग्नेशियम चे प्रमाण भरपूर असल्याने रक्तातील साखर  नियंत्रित ठेवून इन्सुलिन चे सुद्धा नियमन करते. तसेच वरईच्या सेवनाने  पित्ताशयातील खड्यांची निर्मिती थांबते. वरई मध्ये फायबर भरपूर आणि पचनास हलकी असल्याने वरई भुकेचे शमन करते. वजन कमी करताना वरईचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. तसेच कफाचे संतुलन चांगले करते.
 
🟠 राळा
यामध्ये सुद्धा लोहाचे प्रमाण जास्त असल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवते. त्यातील अँटिऑक्सिडंट हा गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवितो. मोड आलेले राळा सेंद्रिय गुळासोबत खाल्ल्यास हाडांचा ठिसूळपणा कमी होऊन हाडे मजबूत होतात. अर्धशिशी, निद्रानाश, कॉलरा, ताप यांच्या उपचार पद्धतीमध्ये राळ्याचा प्रामुख्याने वापर केला जातो.
 
🟠 बाजरी
थंडीच्या दिवसात बाजरी खाणे अत्यंत फायदेशीर ठरते. बाजरीमध्ये स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी असल्यामुळे हृदय नेहमी निरोगी राहते. बाजरीमध्ये असणारे तंतुमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ चयापचय क्रिया, रक्तवाढीसाठी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे बाजरी मधुमेही रुग्णांना उपयुक्त ठरते. बाजरी दमा या आजारावर रामबाण उपाय आहे. काही संशोधनात असं दिसलं आहे की जर आधीच तुम्हाला दमा असेल तर बाजरी खाणे सुरू ठेवा, ज्यामुळे दमा हळूहळू बरा होऊ लागतो. बाजरीमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम यांचे प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे रक्तपुरवठा नियमित होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाजरीचा उपयोग होतो. बाजरीमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचन क्रिया सुरळीत होण्यासाठी उपयोगी पडते. बाजरीच्या सेवनाने आपल्या शरीरातील हाडे मजबुत होतात.
 
जगात भारी आम्ही कोल्हापुरी...
दररोज खातो नाचणी अन् वरी...
 
🟣 डॉ.देवेंद्र रासकर
निसर्ग उपचार तज्ज्ञ व आरोग्यदायी दिनचर्या विषयावरील व्याख्याते