हादक! कानातील हेडफोनमुळे १७ वर्षीय तरुणीचा रेल्वे धडकेत जागीच मृत्यू; इचलकरंजी हादरली
schedule23 Sep 26 person by visibility 167 categoryगुन्हे
इचलकरंजी : कान्हात हेडफोन लावून रेल्वे रुळावरून चालणे १७ वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतल्याची अत्यंत दुर्दैवी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना इचलकरंजीत घडली आहे. धनबाद एक्सप्रेसच्या धडकेत या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. अनुष्का संतोष पवार (वय १७, रा. सुतारमळा, इचलकरंजी) असे मृत पावलेल्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. आज सकाळी सव्वाअकराच्या सुमारास हातकणंगले तारदाळ मार्गावर हा अपघात झाला.
इचलकरंजीतील सुतारमळ्यात राहणारी १७ वर्षीय अनुष्का पवार ही आपल्या दोन मैत्रिणींसोबत हातकणंगले जवळील तारदाळ ग्रामीण रुग्णालया समोरील रेल्वे रुळावरून चालत चालली होती. तिच्या कानात ब्लूटूथ हेडफोन असल्यामुळे मागून येणाऱ्या रेल्वेचा आवाज तिला ऐकू आला नाही. सकाळी १० वाजून ५० मिनिटांच्या सुमारास धनबाद एक्सप्रेस ही रेल्वे कोल्हापूरच्या दिशेने येत होती.
मामागून रेल्वे येत असल्याचे लक्षात येताच मैत्रिणींनी अनुष्काला बाजूला घेण्यासाठी धाव घेतली, परंतु अनुष्कापर्यंत पोहोचण्यापूर्वीच रेल्वेने तिला जोरदार धडक दिली. गंभीर दुपतीमुळे तिचा जागीच मृत्यू झाला. डोळ्यांसमोर आपल्या मैत्रिणीला रेल्वेने उडवल्याने दोन्ही तरुण मैत्रिणींना मोठा मानसिक धक्का बसला आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे हातकणंगलेसह सुतारमळा परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. रेल्वे रुळावरून चालणे किती जीवघेणे ठरू शकते, हे या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले असून, तरुणांनी मोबाईल आणि हेडफोनचा वापर करताना योग्य ती काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.