टक्केवारी गाडण्यासाठी सभागृहात पोहचा : डॉ. मोरे ▪️ कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपचा मेळावा
schedule07 Nov 25 person by visibility 57 categoryराजकीय
कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. यातच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला.
शहरातील नागरी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून प्रश्न सोडवण्याचे काम आप ने केले आहे. रस्ते, उद्याने, किमान वेतन यासारख्या महत्वाच्या प्रश्नावर आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारत पक्षाने कार्यकर्त्यांचे शहरभर जाळे विनले आहे.
सातत्याने नागरिकांसाठी उठवलेल्या आवाजाच्या जोरावर आप निवडणुकीसाठी सज्ज होत आहे. या अनुषंगाने पक्षाने तयारी सुरु केली आहे. कार्यकर्ता मेळावा घेत निवडणुकीत जोमाने उतरण्याच्या सूचना पक्षाचे प्रदेश सचिव डॉ. अभिजित मोरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
महापालिकेतील टक्केवारी गाडण्यासाठी सभागृहात पोहोचणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले कारभारी माजलेत. हा माज आता मतदाराच उतरवतील अशी टीका आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली.
पक्षाचे शहरासाठी असलेले व्हिजन घरोघरी जाण्यासाठी लवकरच मोहीम राबवू, केलेल्या कामाच्या जोरावर विश्वास जिंकावा लागेल, यासाठी प्रत्येकाने पुढचे दोन महिने पायाला भिंगरी लावून काम करावे अशा सूचना देसाई यांनी दिल्या.
राज्यातील वाढत्या खाबुगिरीवर बोलताना, या आधीचे सत्ताधारी चमच्याने खायचे, आताचे सत्ताधारी अक्खे भांडेच तोंडाला लावतात अशी टीका डॉ. मोरे यांनी केली.
कोल्हापूर महापालिकेचे वार्षिक बजेट हजार कोटींवर आहे. स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधी नसल्याने पाच वर्षात हजारो कोटी रुपये राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या मनमानीने खर्च केले गेले. पाच-पाच वर्षे निवडणूक न घेणाऱ्या सरकारचा हिशेब आता जनताच करेल असे डॉ. मोरे म्हणाले.
जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, समीर लतीफ, दुष्यंत माने, प्रसाद सुतार, विजय हेगडे यांची भाषणे झाली.
वसंत कोरवी, किरण साळोखे, राकेश गायकवाड, संजय नलवडे, उषा वडर, अमरसिंह दळवी, डॉ. कुमाजी पाटील, ऍड. सी. व्ही. पाटील, प्रथमेश सूर्यवंशी, लखन काझी, उमेश वडर, रमेश कोळी, चेतन चौगुले, लाला बिर्जे, बाबुराव बाजारी आदी उपस्थित होते.