सांगली फाटा ते उचगाव दरम्यान नवा उड्डाण पुल, कागलजवळचा उड्डाण पूल आणि बास्केट ब्रिजसाठी १ हजार ५० कोटी रुपयांची निविदा प्रसिध्द, खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश
schedule07 Nov 25 person by visibility 81 categoryराजकीय
कोल्हापूर : पुलाची शिरोली इथला सांगली फाटा ते उचगाव दरम्यान सुमारे ४ हजार ८०० मीटरचा पिलरचा उड्डाण पुल होणार आहे. त्याला लागूनच कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठी बास्केट ब्रिज होणार आहे. तर कागलजवळ अडीच किलोमीटरचा उड्डाण पुल बांधला जाईल. दोन्ही उड्डाण पुल आणि बास्केट ब्रिजसाठी १ हजार ५० कोटी रुपयांची निविदा प्रसिध्द झाली आहे. त्यामुळे महापूराच्या काळात महामार्गावरून कोल्हापुरात सहज येता येईल आणि बास्केट ब्रिजमुळे तावडे हॉटेल चौकातील वाहतूक कोंडी थांबेल, असा विश्वास निर्माण झाला आहे.
खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून आणि पाठपुराव्यातून बास्केट ब्रिजचे डिझाईन तयार झाले आहे. सध्या पुणे-बेंगलोर महामार्गावरून शिरोलीकडून कोल्हापुरात येताना, पंचगंगा नदी पुलाजवळ अरूंद रस्ता आहे. तर तावडे हॉटेल चौकात नेहमीच वाहतूक कोंडी असते. बास्केट ब्रिज अस्तित्वात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रशस्त आणि दिमाखदार मार्ग अस्तित्वात येणार आहे. पुलाची शिरोली इथल्या सांगली फाटयापासून पिलरचा ब्रिज सुरू होईल आणि तो उचगावजवळ उतरेल. त्यामुळे महापुराच्या काळातही महामार्गावरील वाहतूक सुरळीत चालू राहील.
शिवाय पिलरचा उड्डाण पुल असल्यामुळे महापूराचे पाणी आडून राहणार नाही. याच उड्डाण पुलाला लागून कोल्हापूर शहरात प्रवेश करणारा बास्केट ब्रिज असेल. याशिवाय कागलजवळ सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा उड्डाण पुल होणार आहे. या सर्व कामासाठी सोमवारी सुमारे १ हजार ५० कोटीची निविदा प्रसिध्द झाली आहे. ही निविदा भरण्याची अंतिम मुदत १९ डिसेंबर आहे. ठेकेदार निश्चित झाल्यानंतर, तातडीने प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल आणि पुढील दोन वर्षात तावडे हॉटेलजवळ बास्केट ब्रिज अस्तित्वात येईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे.