खळबळजनक: शिवीगाळ केल्याचा राग मनात धरला अन् थेट दगडाने ठेचून काढला जीव! कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार; २४ तासांत आरोपींना बेड्या
schedule09 Mar 26 person by visibility 179 categoryगुन्हे
कोल्हापूर : शहरातील मणेर मळा परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही तासांत दोन सराईत आरोपींना शिताफीने अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अर्चना प्रशांत पंडित यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ८ मार्च रोजी सायंकाळी ६ ते ९ मार्च रोजी सकाळी ९.३० च्या दरम्यान ही घटना घडली. मणेर मळा येथील हनुमान तरुण मंडळाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत प्रशांत बाबूराव पंडित यांना अज्ञात इसमाने डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले होते, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने भारती विद्यापीठाकडे जाणाऱ्या रोडवर सापळा लावून यश दिपक दोरकर (वय २१, रा. उचगाव) आणि अमित खुद्बुद्दीन आयनापुरे (वय २२, रा. विक्रमनगर, कोल्हापूर) या दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. मयत प्रशांत पंडित यांनी शिवीगाळ केल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. याच रागातून आरोपींनी त्यांना मारहाण करून डोक्यात दगड घालून त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.