‘गोकुळ’मुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना ; अमोल येडगे
schedule29 Mar 25 person by visibility 259 categoryउद्योग

▪️जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची गोकुळ दूध संघास सदिच्छा भेट
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, करवीर उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) दूध प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे सदिच्छा भेट दिली असता गोकुळ परिवाराच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक यांच्या उपस्थितीमध्ये गोकुळ प्रधान कार्यालय येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले कि, दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम गोकुळने केले असून जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसायाद्वारे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी भरीव काम गोकुळने केले असल्याचे गौरवोद्गार काढले. कोल्हापूरची भौगोलिक स्थिती येथील हवामान व पोषक वैरण यामुळे जिल्ह्यातील दुधाला चांगली चव आहे. हि चव व गुणवत्ता जपत गोकुळने ग्राहकांना दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे. गोकुळ जिल्ह्यामध्ये प्रत्येक घराघरात पोहोचले आहे त्याचे सर्व श्रेय गोकुळचे पदाधिकारी, दूध उत्पादक, संस्था, संघ कर्मचारी, अधिकारी, ग्राहक, वितरक अशा सर्व घटकांचे असल्याचे यावेळी नमूद केले.
यावेळी गोकुळ राबवत असलेल्या वासरू संगोपन योजना, जनावरांच्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे व बायोगॅस, स्लरी योजनेचे त्यांनी खास कौतुक केले. यावेळी गोकुळ प्रकल्पाला भेट दिली असता त्यांनी संघाची दूध उत्पादन प्रक्रिया प्रत्यक्षपणे अनुभवली तसेच कामकाजाची माहिती घेऊन कामकाजाचे कौतुक केले. यावेळी गोकुळच्या दर्जेदार उत्पादनांचा आस्वाद हि त्यांनी घेतला व गोकुळच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये दुग्ध व्यवसायासाठी काही निधी राखीव ठेवण्यासंदर्भात गोकुळ कडून अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
तसेच कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांनी संघाची माहिती दिली व संचालक अजित नरके यांनी आभार मानले.
याप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, शाकीर पाटील, मंडल अधिकारी उदय लांबोरे, शिवराज देसाई, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, अरविंद जोशी, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, प्रकाश आडनाईक, हणमंत पाटील, बाजीराव राणे, व संघाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.