जलजीवन मिशन कोल्हापूर जिल्हयात शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी उर्वरीत ६७ गावांना निधी द्यावा, खासदार धनंजय महाडिक यांचं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना निवेदन
schedule02 Apr 25 person by visibility 366 categoryराज्य

नवी दिल्ली : केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी.आर.पाटील यांची खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत भेट घेतली. महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी केंद्र सरकारला विनंती पत्र पाठवले आहे. त्या अनुषंगाने खासदार महाडिक यांनी केंद्रीय मंत्री नामदार सी.आर.पाटील यांच्याशी चर्चा केली. जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल, हर घर जल, या योजनेतून प्रत्येक घरात स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवले जाणार आहे.
या योजनेची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत होती. मात्र तोपर्यंत कोल्हापूर जिल्हयातील ६७ गावांमधील योजनांची कागदपत्रांची पुर्तता झाली नाही. परिणामी ही गावं जलजीवन मिशन योजनेला मुकण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर करताना, जलजीवन मिशन अभियान २०२८ पर्यंत राबवण्याचे घोषीत केले आहे. अशावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी राज्य शासनाला पत्र लिहून, कोल्हापूर जिल्हयातील ६७ गावांना योजनेत सहभागी करून घेण्याची विनंती केली. त्यानुसार राज्य शासनानं केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाला विनंती पत्र पाठवले आहे. त्याबद्दल खासदार महाडिक यांनी नामदार सी.आर.पाटील यांचे लक्ष वेधले.
कोल्हापूर जिल्हयातील त्या ६७ गावातील जलजीवन मिशनच्या योजनांना नव्या अभियानात समाविष्ट करून, त्यांना निधी द्यावा. त्यातून कोल्हापूर जिल्हा शंभर टक्के जलजीवन मिशनमध्ये यशस्वी होईल, अशी भूमिका खासदार महाडिक यांनी मांडली. राज्य सरकारने केलेल्या विनंतीला प्रतिसाद देवून, जलजीवन मिशनमध्ये सहभागी होवू इच्छिणार्या, त्या ६७ गावांना निधी देवून, दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी नामदार सी.आर.पाटील यांच्याकडे केली. त्याला नामदार पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.