कोल्हापूर मनपाचा 'सर्जिकल स्ट्राईक'; ६ दिवसांत २९९ विनानोंद मिळकती शोधल्या!
schedule07 May 26 person by visibility 82 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाने शहरातील करआकारणी न झालेल्या तसेच नियमबाह्य बदल झालेल्या मिळकतींवर विशेष मोहीम हाती घेतली असून अवघ्या सहा दिवसांत तब्बल २९९ मिळकतींचा शोध लावला आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आदेशानुसार १ ते ३० मे २०२६ या कालावधीत ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयांमार्फत लिपिकनिहाय भाग निश्चित करून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत २०४ करआकारणी न झालेल्या मिळकती, ६६ मालकाऐवजी भाडेकरू वापर असलेल्या मिळकती तसेच २९ क्षेत्रवाढ झालेल्या मिळकती आढळून आल्या आहेत. संबंधित मिळकतींची मोजमापेही पूर्ण करण्यात आली आहेत.
महापालिकेकडून आता या मिळकतींची अंतिम करआकारणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मिळकतधारकांकडून बांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, भाडे करार पत्र तसेच क्षेत्रवाढीसंदर्भातील नगररचना विभागाची परवानगी मागविण्यात आली आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली असून मुदतीत कागदपत्रे न दिल्यास संबंधित मिळकत अनधिकृत समजून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २६७-अ नुसार शास्तीसह करआकारणी करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, शहरातील ज्या मिळकतींची अद्याप करआकारणी झालेली नाही, अशा मिळकतधारकांनी तातडीने जवळच्या विभागीय कार्यालयातील घरफाळा विभागाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.