संजय घोडावत आय.टी.आय. मधून ४२२ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स, पुणे येथे निवड
schedule29 Mar 25 person by visibility 273 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या आय.टी.आय. विभागात नुकताच टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल, पुणे या नामांकित वाहन निर्मिती कंपनीच्या वतीने कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध आय.टी.आय. मधून एकूण ४८० विद्यार्थ्यांनी मुलाखतीसाठी सहभाग घेतला. त्यापैकी ४२२ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड टाटा मोटर्सने केली.
टाटा मोटर्सच्या वतीने प्रताप गायकवाड, ओम काकड आणि अभय निकम यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. या निवडीमुळे विद्यार्थ्यांना करिअरची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे, असे इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी निवड यादी जाहीर करताना सांगितले. संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करून आपल्या करिअरची सुरुवात करावी, असे सांगून त्यांनी सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कंपनीचे अधिकारी प्रताप गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना कंपनीचे नियम, मिळणाऱ्या सुविधा आणि पगार याबाबत सखोल मार्गदर्शन केले. हा कॅम्पस ड्राइव्ह यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी आय.टी.आय. विभागाचे प्राचार्य स्वप्निल ठिकने, गटनिदेशक अविनाश पाटील, सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुजित मोहिते यांनी केले.
संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
.