हज यात्रेकरूंसाठी शिरोली येथील दारूल उलूम मदरस्यामध्ये 3 एप्रिल पासून 5 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबीर
schedule27 Mar 25 person by visibility 352 categoryसामाजिक

कोल्हापूर : यंदा हज कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने सौदी अरेबिया येथील पवित्र मक्का आणि मदिना या शहरांच्या पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या स्त्री-पुरुष हज यात्रेकरूंच्यासाठी शिरोली येथील दारूल उलूम मदरसा येथे 3 एप्रिल पासून पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील स्त्री पुरुष हज यात्रेकरू हज यात्रेला जाणार आहेत.यामध्ये केंद्र सरकारच्या हज कमिटी ऑफ इंडिया च्या वतीने आणि प्रायव्हेट टूर ऑपरेटर्स च्या वतीने सुमारे 700 च्या वर हज यात्रेकरू जाणार
आहेत. गेल्या 6 महिन्यापासून अर्ज दाखल करण्यापासून त्यांना आरोग्य तपासणी शिबीर आणि हज दरम्यान केल्या जाणाऱ्या विधींचे प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू आहे.
याचाच एक भाग शिरोली मदरसा येथे म्हणून 5 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये मक्का येथील काबाची भव्य प्रतिकृती उभारून प्रत्यक्ष विधी कसे केले जातात याबाबत माहिती दिली जाणार आहे.तसेच मक्का आणि मदिना या पवित्र शहरातील सर्व केल्या जाणाऱ्या विधींचे फलक प्रदर्शन सुद्धा लावण्यात येणार आहे.
महिला हज यात्रेकरूं मात्र सलग पाच दिवस सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत घरातून येऊन जाऊन या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात,त्यांच्यासाठी निवासाची सुविधा नाही.
दरम्यान या प्रत्यक्ष निवासी हज प्रशिक्षण शिबिराचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व हज यात्रेकरूंनी घ्यावा असे आवाहन हज फौंडेशनचे अध्यक्ष समीर मुजावर व लिम्रास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष इकबाल देसाई यांनी केले आहे.