कोल्हापुरात 'महाराष्ट्रधर्म' शिबिराचे आयोजन: पुरोगामी विचारांच्या संवर्धनासाठी जनजागरणाची हाक
schedule01 Jun 26 person by visibility 81 categoryसामाजिक
कोल्हापूर: पुरोगामी वारसा असलेल्या महाराष्ट्राची सध्याची स्थिती आणि त्यापुढील आव्हाने यावर मंथन करण्यासाठी 'मराठी अभ्यास केंद्र, मुंबई' यांच्या पुढाकाराने कोल्हापुरात विशेष 'महाराष्ट्रधर्म' शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी ४ जून २०२६ रोजी कोल्हापुरातील महावीर कॉलेज, न्यू पॅलेस, नागाळा पार्क येथे सायंकाळी ४ ते ७ या वेळेत हे शिबिर संपन्न होणार असून याद्वारे राज्यव्यापी जनजागरणाचा कृतीकार्यक्रम आखला जाणार आहे.
मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, सध्याचे राजकारण आणि सामाजिक ध्रुवीकरण यामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक अस्तित्व धोक्यात आले असून, फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न जपण्यासाठी तसेच भाषिक व सांस्कृतिक सत्व टिकवण्यासाठी पुन्हा एकदा एक सशक्त 'महाराष्ट्रवादी' चळवळ उभी करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. 'महाराष्ट्रधर्म' म्हणजे नेमके काय, हे समजून घेणे आणि त्या आधारे लोकशाही व संविधानावर निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांना एकत्र आणणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
या शिबिरात भाषेसह शिक्षण, कृषी आणि पर्यावरण या क्षेत्रांत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना व नागरिकप्रेमींना आमंत्रित करण्यात आले असून, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, अर्थतज्ज्ञ डॉ. नीरज हातेकर, मुफिद मुजावर आणि डॉ. प्रकाश परब हे तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी खुल्या चर्चेचे व प्रश्नोत्तरांचे विशेष सत्रही आयोजित केले असून, कोल्हापूर शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका पातळीवरील महाराष्ट्रप्रेमी कार्यकर्त्यांनी आणि संवेदनशील नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.