पन्हाळ्यातील शिवतीर्थ तलावातील शिवस्मारकाचे सुशोभीकरणासाठी विकास आराखडा तातडीने तयार करावा : जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule12 May 25 person by visibility 353 categoryराज्य

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील पन्हाळा महत्त्वाचा किल्ला आहे. या गडवरील ऐतिहासिक शिवतीर्थ तलावातील शिवस्मारकाचे सुशोभीकरण दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. या सुशोभीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची मागणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सविस्तर विकास आराखडा तातडीने तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
पन्हाळा गिरीस्थान नगरपरिषद येथील ऐतिहासिक शिवतीर्थ तलावातील शिवस्मारकाचे सुशोभीकरण कामाबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी आमदार चंद्रदीप नरके, उपजिल्हाधिकारी (महसूल) संपत खिलारी, जि.प.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, पर्यटन मार्गदर्शक डॉ. अमर अडके, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, पन्हाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी आदी उपस्थित होते.
शिवतीर्थ तलावातील शिवस्मारकाचे सुशोभीकरण करताना त्यांच्या मुळ सौंदर्याला कुठेही बाधा येवू नये यााप्रमाणे सविस्तर कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना देवून जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, पावसाळ्यामध्ये पाण्याचा योग्य निचरा होईल यासाठी ड्रेनेज सिस्टीम तयार करण्यात यावी. पावसाळ्यानंतर तलावातील पाणी खराब होवू नये याासाठी पाणी शुध्दीकरण यंत्रणा बसविण्यासाठी आराखड्यात सामावेश करावा. तलावातील पाण्यावर कारंजे बसविण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेवून याबाबत यंत्रणांनी नियोजन करावे, असे सांगून सुशोभीरणाासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या.
आमदार चंद्रदीप नरके व पर्यटन मार्गदर्शक डॉ. अमर अडके यांनी सुशोभिकरण विकास आराखडा व निधी प्रस्तावाबाबत महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. बांधकाम विभागाने सुशोभीकरणाबाबतचा नकाशा यावेळी सादर केला.