रमजान : मानवकल्याणाची भावना जपणारा पवित्र महिना
schedule14 Mar 24 person by visibility 449 categoryसंपादकीय
भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. विविध धर्म,जाती, प्रांत, आणि नैसर्गिक संपत्तीने समृध्द असलेल्या या देशात प्रत्येक जाती धर्माच्या त्यांच्या त्यांच्या धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे धार्मिक सण उत्सव व व्रते याद्वारे सुसंस्कार केले जातात. या देशात अनेक धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने गेल्या शेकडो वर्षांपासून नांदतात. प्रत्येक धर्मात सण- व्रते - उत्सव यांची परंपरेने साजरे करण्याची प्रथा आहे. त्याकरिता संविधानाने कोणालाही प्रतिबंध केलेला नाही.
अर्थात भारतीय समाज हा उत्सवप्रिय आहे. उत्सवाच्या माध्यमातून भारतीय समाजाने जगण्यातील वेदना विसरण्याचा प्रयत्न केला आहे. उत्सवाच्या माध्यमातून एकात्मिक रचनेच्या बळकटीकरणासाठी समाजाने नेहमीच प्रयत्न केले आहेत. हिंदू धर्मीय असो वा इस्लामी, भारतीय समाजाने सण उत्सवाचे रुप सामाजिक सौहार्दाच्या अधिष्ठानावर आकाराला आणले आहे. मुस्लिम समाजातील रमजान ईद ला हिंदू धर्मियांच्या दिवाळी सणाच्या इतकेच महत्व आहे.
'इस्लाम' हा अरबी शब्द 'सिलम' या धातूपासून बनलेला आहे. याचा अर्थ शांततेचा स्विकार करणारा असा आहे. इस्लाम धर्माच्या संस्थापकाची प्रमुख शिकवण अशी होती की, "जगातील यच्चयावत प्राणी ही एकाच ईश्वराची लेकरं आहेत, तोच सर्वांचा पिता आहे. सारी मानवजात त्या एका परमेश्वराचा आविष्कार आहे. सर्वांवर प्रेम करा, विधायक शिष्टाचार, सभ्यता, संस्कृती, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही इस्लाम धर्माची महत्वाची जीवनमूल्ये आहेत." आधुनिक युगातील पुरोगामी विचार प्रणालीची उभारणी इस्लामच्या सर्वधर्मसमभाव या तत्त्वावर झाली आहे.
रमजान ईद हा सण मुस्लिम बांधवांचा अत्यंत आनंदाचा व श्रमसाफल्याचा सण आहे. रमजान ईद म्हणजे मुस्लिम बांधवांची दिवाळी होय. या सणापूर्वी रमजानचे रोजे (कडक उपवास) केले जातात. रमजान या संपूर्ण महिनाभरात मुस्लिम धर्मीय कडक उपवास करतात, विविध वस्तूंचे दान करतात .सोशिकता तसेच पुण्यप्रद वागणूक याला फार महत्त्व आहे. हिजरी सनाचा नववा महिना हा रमजान महिना आहे.
या सर्व सणात चंद्रदर्शनाला अतिशय महत्त्व आहे. मुस्लिम बांधवांना शुध्द प्रतिपदेचा चंद्र दर्शन होणे महत्त्वाचे असते. सर्व मुस्लिम धर्मीयांनी निरोगी असतांना व पुढे ही वर्षभर निरोगी राहण्यासाठी एक महिना उपवास ( रोजे) करावेत , असा नियम आहे. या दिवसात सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाण्याचा एक थेंब ही पोटात घ्यावयाचा नसतो. थुंकी सुध्दा पोटात जाऊ दिली जात नाही, रोजा हा श्रीमंताला गरीबीची जाणीव करून देतो. एखादा गरीब जेव्हा दोन वेळेचे जेवण न करता एक वेळ जेवुन उपाशी राहतो व त्याला ज्या वेदना सहन कराव्या लागतात त्या वेदनांची जाणीव श्रीमंताला या रोजामुळे होते. एका सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की,दररोज लाखो लोक उपाशीपोटी झोपतात, अशा उपाशीपोटी झोपणाऱ्या गोरगरीबांना आपल्या आर्थिक अडचणींविषयी किती चिंता व काळजी असेल, हा विचार प्रत्येक रोजा (उपवास) करणाऱ्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करून जातो. श्रीमंत लोकांच्या मनात गरीबाबद्दल आदर, दया, आस्था व करूणेची भावना या रोजामुळे निर्माण होते, याचा परिणाम अन्न धान्य, दान धर्माची इच्छा प्रबळ होऊन ती गरिबांच्या पदरात पडून बर्याच आर्थिक समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा होतो. तसेच इतरांबद्दल चांगल्या वागणुकीची सवय रोजा करणाऱ्यांच्या मनात या रमजानच्या रोजामुळे होते. यावेळी दिवसांच्या पाच ही नमाज पार पाडल्या जातात. कुरआनातील आयतींचे पठण नमाजमध्ये केले जाते. आपल्याला नमाज ची वेळ कळण्यासाठी विविध मस्जिदीत अजान दिली जाते. ज्यामुळे मुस्लिम बांधव मस्जिदीकडे धाव घेतात. अजानमध्ये उच्चारण्यात येणारे शब्द "अल्लाहु... अकबर" याचा अर्थ असा होतो की, तो सर्व श्रेष्ठ अल्लाह आहे. आणि त्याच्या प्रार्थनेची, नमाजची वेळ झालेली आहे. मस्जिदीत कुणीही यावे. गोरा असो वा काळा, राजा असो वा गरीब सर्वजण त्या पवित्र ठिकाणी सर्व भेदभाव विसरून एका रांगेत उभे राहून नमाज अदा करतात. दिवसातून पाच वेळा नमाज व्यतिरीक्त रमजान महिन्यात रात्री नमाजनंतर तराविहची विशेष अशी नमाज पूर्ण महिनाभर होते. कुराण ग्रंथाचे पारायण केले जाते. इतर ऐहिक सुखाच्या कल्पना सोडून देऊन केवळ ईशचिंतन केले जाते. दररोज रात्रीची नमाज पडण्यापूर्वी मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देऊन एकत्रित अन्नग्रहण करतात. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव परस्परांना पंचपक्वाने, मेवा मिठाई व फळफळावळ खाऊ घालतात. विशेषतः गोरगरीब व फकीर यांना मोठ्या प्रमाणात भेट देतात. विशेष म्हणजे या महिन्यात गरींबांविषयी कणव, दया, व सहानुभूती दाखवली जाते. मानवकल्याणाची भावना जपली जाते. मानवी मुल्यांची उद्घोेषणा केली जाते. रमजानच्या महिन्यात जकातच्या माध्यमातून आर्थिक समन्वयातून सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. समाजोपयोगी कामे केली जातात. मोठ्या प्रमाणात सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी सर्वधर्मीयांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. अनेक मुस्लीम बांधव जकातच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतात. अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्था ह्या जकातच्या माध्यमातून विधायक कार्य करत आहेत. ईदच्या माध्यमातून अनेक भारतीय समाजबांधवांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जवळ येण्यासाठी एक माध्यम उपलब्ध होते. त्यामुळे ईदचे सामाजिक महत्व आधिक आहे.
रमजान ईद दिवशी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात दानधर्म तर करतातच. नमाज अदा करून विश्वशांतीसाठी प्रार्थनाही करतात. ईष्टमित्रांना मिष्टान्न भोजन देतात, एकमेकांना कडकडून भेटतात व प्रेमाचा वर्षाव करतात. सामुदायिक उपवास, प्रार्थना व चारित्र्य शुध्दीकरण याला या सणात फारच महत्त्व दिले आहे. तसेच शारीरिक व मानसिक साधना व तप याला ही महत्व दिले जाते.
रमजान ईद दिवशी मुस्लिम बांधव सकाळी लवकर अभ्यंग स्नान करून शुचिर्भूत होतात. नवीन कपडे परिधान करतात. गोरगरीबांना व अनाथ अपंगांना धान्य, कपडे व पैसे वाटतात. अपरिग्रह पाळतात. सामुदायिक नमाजपठण करतात. एकमेकांच्या गळ्यात पडून भेटतात व अभिष्टचिंतन करतात. आपण सारे बांधव एक आहोत अशी उदात्त शिकवण आचरणात आणतात. यातूनच सामाजिक सलोखा व सहवेदना जपल्या जातात. एकमेकांबद्दल परस्पर प्रेम, आदर व्यक्त करतात.
भारतात रमजान ईद या आनंददायी सणात मुस्लिम धर्मीयांसमवेत सर्व धर्मबांधव सहभागी होतात. एकमेकांच्यात सामाजिक सलोखा व शांतता तसेच प्रेमाचा संदेश देणाऱ्या रमजान ईद सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारा रमजान ईद हा सण देशभरात मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. या सणामागील असणारा उदात्त हेतू, अधोरेखित होणे आवश्यक आहे, केवळ उपचारासाठी सण साजरे करणे अयोग्य आहे. त्या त्या सणांच्या निमित्ताने होणारी सद्भावना व सद्विचार तसेच बंधुता यांचे अविष्करण होणे, गरजेचे आहे.
✍️ डॉ. सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर.
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)