बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा बिगुल; अँड. आकाश मोरे यांच्या रूपाने नवा चेहरा मैदानात
schedule05 Apr 26 person by visibility 121 categoryराज्य
मुंबई : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर करून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे आकाश विश्वनाथ मोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून, त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. आकाश मोरे हे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते विजयराव मोरे यांचे पुत्र असून, सध्या ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये सचिव पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
तरुण आणि सुशिक्षित चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून, काँग्रेसच्या या निर्णयामुळे बारामतीची निवडणूक आता त्रिकोणी किंवा चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आणि महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांनी घेतलेल्या सावध भूमिकेनंतर काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा पवित्रा घेतला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने (SP) या निवडणुकीत उमेदवार न देण्याचे संकेत दिले असताना, काँग्रेसच्या या स्वतंत्र भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
या उमेदवारीमुळे बारामतीचा राजकीय पेच अधिकच वाढला आहे. सुनेत्रा पवार यांच्यासमोर आकाश मोरे यांचे आव्हान किती प्रबळ ठरेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे की, पक्षाची ताकद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता बारामतीच्या या प्रतिष्ठेच्या लढाईत मतदारांचा कौल कोणाकडे झुकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.