महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणारे टी.ई.टी. (शिक्षक पात्रता परिक्षा) परिक्षा पुर्वीच पेपर फुटीचा प्रयत्न करणारे रॅकेट उघडकीस
schedule23 Nov 25 person by visibility 58 categoryगुन्हे
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणारे टी.ई.टी. (शिक्षक पात्रता परिक्षा) परिक्षा पुर्वीच पेपर फुटीचा प्रयत्न करणारे रॅकेट उघडकीस आले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, प्रींटर, मोबाईल, चारचाकी वाहन व इतर साहित्य असा एकूण 16,00,000/-रु चा मुद्देमाल जप्त, एकूण 07 आरोपी अटक व 10 संशयीत ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मुरगूड पोलीस यांनी संयुक्तपणे केली.
महाराष्ट्र शासनाने नवीन शिक्षक नियुक्त करणेपुर्वी त्यांनी त्यांचे डी.एड., बी. एड. शिक्षणासह टी.ई.टी. परिक्षा (शिक्षक पात्रता परिक्षा) उत्तीर्ण असणे अनिवार्य केले असलेने प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचे शिक्षक होण्याचे शिक्षण पूर्ण झाले असले तरी टी.ई.टी. परिक्षा देणे बंधनकारक केले आहे. सदरची परिक्षा ही महाराष्ट्र शासनातर्फे घेतली जाते व शासनाने जाहीर केलेप्रमाणे टी.ई.टी. परिक्षा दि. 23.11.2025 रोजी होती. सदर परिक्षेस बसणारे विद्यार्थ्यांकडून त्यांची मुळ कागदपत्रे व काही रक्कम घेवून परिक्षेपुर्वी पेपर देतो असे सांगून फसवणूक करणावी टोळी कागल व राधानागरी तालुक्यात कार्यरत असून सदर टोळीतील दत्तात्रय चव्हाण व गुरुनाथ चौगले हे दोघे राधानगरी तालुक्यात राहणारे असून ते टी.ई. टी. परिक्षाचे अगोदरचे रात्रौंचे वेळी विद्यार्थ्यांना पेपरची झेरॉक्स देतात. तसेच ते दोघेजण दि. 23.11.2025 रोजी होणारे टी.ई.टी. परिक्षाचे अगोदरचे रात्री परिक्षास बसणारे व त्यांचे संपर्कात असणारे विद्यार्थ्यांना सोनगे, ता. कागल याठिकाणी बोलावून घेवून त्यांचेकडून शैक्षणिक मुळ कागदपत्रासह प्रत्येकाकडुन रोख रक्कम घेवून टी.ई.टी. परिक्षाच्या पेपरची झेरॉक्स देणार असलेबाबत कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांना माहिती मिळाली. मिळाले माहितीचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी गोपनीयता ठेवून कारवाई करणेकरीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना योग्य त्या सुचना देवून कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
वरिष्ठांनी दिले आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच मुरगूड पोलीस ठाणे सहा. पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी करे, स्थानिक गुन्हे शाखेचे व मुरगूड पोलीस ठाणेकडील पोलीस अमंलदार व महिला पोलीस अमंलदार यांची वेगवेगळी चार तपास पथके तयार केली. मिळालेले माहितीबाबत सर्व पथकास योग्य त्या सुचना देवून प्रत्येकाची जबाबदारी निश्चीत केली. त्यानंतर मिळाले माहितीप्रमाणे पथकाने सोनगे, ता कागल येथील शिवकृपा फर्नीचर मॉल या फर्नीचर दुकानामध्ये दि. 23.11.2025 रोजी पहाट रात्रौ 01.15 वा. चे सुमारास छापा टाकला. नमुद मॉलमध्ये 01] दत्तात्रय आनंदा चव्हाण, रा. कासारपुतळे, ता राधानगरी, जि. कोल्हापूर, 02] गुरुनाथ गणपती चौगले, वय 38, रा. सोन्याची शिरोली, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर, 03] अक्षय नामदेव कुंभार, वय 27, रा. सोनगे, ता कागल, जि. कोल्हापूर, 04] किरण साताप्पा बरकाळे, वय 30, रा ढेंगेवाडी, ता राधानगरी, जि. कोल्हापूर, 05] नागेश दिलीप शेंडगे, वय 30, रा. सावर्डे पाटणकर, ता राधानगरी, जि. कोल्हापूर यांचेसह इतर पाच विद्यार्थी मिळुन आले. त्यांचेकडे चौकशी केली असता अ.नं. 01 ते 05 हे राहुल अनिल पाटील, रा. शिंदेवाडी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर याचेकरीता काम करीत असून राहुल पाटील हा दि. 23.11.2025 रोजी होणारे टी.ई.टी. परिक्षाचे पेपरची झेरॉक्स याठिकाणी आणून देणार असलेचे सांगीतले. तसेच सदर ठिकाणी हजर असलेले इतर पाच जणहे विद्यार्थी असून दि. 23.11.2025 रोजी टी.ई.टी.चे परीक्षा देणार असलेचे सांगीतले. दत्तात्रय चव्हाण वगैरे पाच इसमांचे कब्जात व फर्नीचर मॉलमध्ये वेगवेगळया शिक्षण संस्थेची वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची नांवे असलेली पदवीकेची मुळ कागदपत्रे व कोरे चेक, कॅनॉन कंपनीचा प्रींटर व इतर साहित्य मिळुन आले. सदर ठिकाणी पंचनामा व चौकशी सुरु असतानाच राहुल पाटील याने आपण मुदाळ तिट्टा याठिकाणी थांबलो असून पेपर मिळताच सोनगे ता. कागल या ठिकाणी येत आहे असे त्याने फोनव्दारे कळविले. त्यानंतर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपास पथकापैकी पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांचे पथक मुदाळ तिट्टा, ता. कागल येथे पाठवून 06] राहुल अनिल पाटील, वय 31, रा शिंदेवाडी गडहिंग्लज, ता गडहिंग्लज, जि. कोल्हापूर व 07] दयानंद भैरु साळवी, वय 41, रा तमनाकवाडा, ता कागल, जि. कोल्हापूर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर राहुल पाटील याचेकडे तपास केला असता, 08) महेश भगवान गायकवाड, रा. सातारा हा दि.23.11.2025 रोजी होणारे टी.ई.टी. परीक्षेचा पेपर राहुल पाटील यास देणार होता. त्यानंतर राहुल पाटील हा त्याचेकडे मिळालेला पेपर हा पुढे त्याचे एजंटाकरवी टी.ई.टी. परिक्षेस बसणारे विद्यार्थ्यांना देणार होता. त्याकरीता तो विद्यार्थ्याकडून प्रत्येकी तीन लाख रुपये व शैक्षणिक मुळ कागदपत्रे घेत असे. टी.ई.टी. परिक्षेचा निकाल लागलेनंतर विद्यार्थ्यांची मुळ कागदपत्रे परत करीत असे अशी माहिती समोर आली. तपासात विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, प्रींटर, मोबाईल हँन्डसेट, चारचाकी वाहन व इतर साहित्य असा एकूण 16,00,000/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर घटनेबाबत स्था. गु.अ. शाखेचे पो. हे. कॉ. युवराज पाटील यांनी दिले तक्रारीवरुन एकूण आठ आरोपी विरुध्द मुरगूड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला. सदरचा गुन्हा दाखल झालेनंतर ताब्यात असलेले आरोपीकडे अधिक तपास करून त्यांना मदत करणारे त्यांचे कोल्हापूर व कराड येथील दहा साथीदारांना गिरगांव, ता. करवीर येथून ताब्यात घेतले असून त्यांचेकडे तपास सुरु आहे. तसेच सदर टोळीतील मुख्य सुत्रधार महेश भगवान गायकवाड, रा. सातारा याचा शोध घेणेकरीता एक तपास पथक रवाना केले आहे.
कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांना मिळालेले माहितीप्रमाणे व त्यांनी केले मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे पथकाने योग्य ती खबरदारी घेवून आरोपी राहुल अनिल पाटील हा महेश भगवान गायकवाड, रा. कराड याचेकडून टी.ई.टी. परिक्षेचे पेपर घेवून तो पुढे आपले एजंटाकरवी सदर परिक्षेस बसणारे विद्यार्थ्यांना शोधून त्यांचेकडुन शैक्षणीक कागदपत्रे व कोरे चेक घेवून त्यांना पेपरच्या झेरॉक्स प्रती देवून विद्यार्थ्यांची व शासनाची फसवणूक करणेपुर्वीच त्यांचा कट उघडकीस आणून संपुर्ण रॅकेटचा फर्दाफाश केला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक, योगेशकुमार यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, मुरगूड पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी करे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव तसेच पोलीस अमंलदार युवराज पाटील, राजेश राठोड, विनोद चौगुले, प्रदिप पाटील, राजू कोरे, रोहीत मर्दाने, विजय गोसावी, अमित सर्जे, अमित मर्दाने, निवृत्ती माळी, महेश खोत, सागर चौगुले, राजेंद्र वरंडेकर, सुशिल पाटील, संदीप ढेकळे, संतोष भांदिगरे, रविंद्र जाधव, रघुनाथ राणभरे, भैरु पाटील, रुपेश पाटील व महिला पोलीस अमंलदार मिनाक्षी कांबळे यांनी केली आहे.