कोल्हापूरकरांचा प्रवास सुसह्य होणार; नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर आता पोलीस प्रशासनाची करडी नजर!
schedule03 Mar 26 person by visibility 95 categoryसामाजिक
कोल्हापूर : शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कोल्हापूर पोलीस प्रशासनाने आता कंबर कसली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच रिक्षा युनियन पदाधिकारी आणि आरटीओ प्रशासनाची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत रिक्षा चालकांना शिस्त पाळण्याचे कडक निर्देश देण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
▪️बैठकीतील महत्त्वाचे निर्देश:
* गणवेश सक्ती: सर्व रिक्षा चालकांनी ड्युटीवर असताना ड्रेस कोडचे पालन करणे अनिवार्य आहे.
* उद्धट वर्तवणूक व भाडे नाकारणे: प्रवाशांशी अरेरावी करणे किंवा भाडे नाकारल्यास कडक कारवाई होईल.
* नो-एन्ट्री व विरुद्ध दिशा: मध्यवर्ती बसस्थानक (वटेश्वर मंदिर परिसर) येथे रात्रीच्या वेळी विरुद्ध दिशेने रिक्षा नेणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जाईल.
* शिस्तबद्ध पार्किंग: रिक्षा स्टॉपवर क्षमतेपेक्षा जास्त रिक्षा लावणे किंवा रस्त्याच्या मध्यभागी 'डबल पार्किंग' करून अडथळा निर्माण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
▪️एकाच दिवसात २९ रिक्षांवर कारवाई:
या मोहिमेअंतर्गत दि. ३ मार्च रोजी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २९ रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये १२ रिक्षा जप्त करण्यात आल्या असून, एकूण ३९,९०० रुपयांचा दंड (थकीत दंडासह) वसूल करण्यात आला आहे. विना बॅच रिक्षा चालवणे आणि विनाकारण वाहतूक कोंडी करणे यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे. प्रवाशांनीही तक्रारी असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.